हवामान बदलांचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) व अमेरिकेतील नासा या दोन संस्था संयुक्त रीत्या एक उपग्रह सोडणार आहेत, त्यात प्रामुख्याने भूंकप व त्याचे वेगवेगळी रूपे यांवरही संशोधन केले जाणार
आहे.
हवामान बदल उपग्रह कार्यक्रमाच्या माध्यमातून अमेरिका व भारत प्रथमच मोठय़ा प्रकल्पात एकत्र येत आहेत. त्यांनी आता कार्यकारी गट स्थापन केला असून मंगळ मोहिमेतही इस्रो अमेरिकेशी सहकार्य करणार आहे. हवामान बदल उपग्रह म्हणजे नासा इस्रो सिंथेटिक अ‍ॅपर्चर रडार असून त्याचे संक्षिप्त नाव निसार असे आहे. दोन्ही अवकाश संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीवरील गुंतागुतींच्या प्रक्रिया, भूकंप-त्यांचे वेगवेगळे प्रकार, ज्वालामुखी, दरडी कोसळणे, हिमाच्छादने वितळणे, सुनामी व पर्यावरणाची हानी अशा अनेक गोष्टींचा त्यात अभ्यास केला जाईल. निसार उपग्रहाची बांधणी करताना एल व एस बँड सह पेलोडचा विचार केला जाईल. यात नासा एल बँड कंपोनंट पुरवणार आहे तर इस्रो एस बँड कंपोनंटर तयार करणार आहे. निसार उपग्रह इ.स. २०२० किंवा २०२१ दरम्यान सोडला जाणार असून दोन्ही देश किती वेगाने काम करतात यावर पुढची मोहीम अवलंबून आहे. इस्रो व नासा यांचा उपग्रह हा पृथ्वीच्या अभ्यासासाठी पाठवला जाणारा पहिला उपग्रह नाही. पृथ्वीचा अभ्यास करणारे किमान १३० उपग्रह सध्या अवकाशात फिरत असून ते पृथ्वीचा अभ्यास करीत आहेत. फक्त या संशोधनात कुठलाच समन्वय नाही त्यामुळे एवढे उपग्रह सोडूनही ठोस काही हाती आलेले नाही. निसार उपग्रह हा सागरी पातळी, दरडी कोसळणे, जैवभार यावर बरीच माहिती देऊ शकेल. गेल्या काही वर्षांत जागतिक तापमान बरेच वाढले असून १८९० नंतर २०१५ हे सर्वात उष्ण वर्ष मानले गेले आहे.
हवामान बदलांमुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीला धोका आहे व हिमआच्छादन वितळण्याने सागरी जल सखल भागात जाऊ शकते तसेच सागरी जीवांना धोका निर्माण होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nasa isro to launch satellite to study earthquakes and climate change
First published on: 07-04-2016 at 01:49 IST