नासाच्या वैज्ञानिकांनी जीवनाचे मूळ शोधण्यासाठी केलेल्या प्रयोगात आनुवंशिक पदार्थातील तीन घटक तयार करण्यात यश मिळवले आहे.
संशोधकांनी पायरिमिडाइनचा समावेश असलेल्या बर्फाच्या नमुन्यावर अतिनील प्रारणांचा मारा केला असता अवकाशीय अवस्थेत जीवनासाठी आवश्यक असे घटक निर्माण होतात. पायरिमिडाइन हे चक्राकार रेणू असून ते कार्बन व नायट्रोजनचे बनलेले असतात व ते युरॅसील, सायटोसिन व थायमिन यांच्या रचनेच्या मध्यवर्ती स्थानी असतात. आरएनए म्हणजे रायबोन्युक्लिइक आम्ल व डीएनए म्हणजे डिऑक्सिरायबोन्युक्लिइक आम्ल यांच्यातील जनुकीय संकेतावलीचा युरॅसील, सायटोसिन व थायमिन हे भाग असतात. डीएनए व आरएनए हे प्रथिन संश्लेषणात मध्यवर्ती भूमिका पार पाडत असतात.
नासाच्या अ‍ॅमेस रीसर्च सेंटरचे मायकेल न्युइव्हो यांनी सांगितले, की आम्ही प्रथमच आरएनए व डीएनएचे घटक असलेले युरॅसील, सायटोसिन व थायमिन अजैविक पद्धतीने प्रयोगशाळेत तयार केले आहेत. बाह्य़ अवकाशातील स्थिती प्रयोगशाळेत निर्माण करून पृथ्वीवरील जीव निर्मितीसाठी लागणारे घटक तयार करता येतात हे दाखवून दिले आहे. यात बर्फाचा नमुना एका कक्षातील पात्रात ठेवून त्यावर हायड्रोजन पंपातून अतिनील किरणांचा मारा केला. या प्रयोगात संशोधकांनी अवकाशातील परिस्थिती तयार करताना हवेची पोकळी, कमी तपमान व दाहक प्रारणे तयार केली. त्यात असे निदर्शनास आले की, जेव्हा पायरिमिडाइन हे पाणी, अमोनिया, मेथॅनॉल किंवा मिथेन यांचा समावेश असलेल्या बर्फात गोठवलेल्या अवस्थेत असताना त्याचा प्रारणांनी नाश होण्याची शक्यता कमी होती परंतु खुल्या अवकाशात वायूरूप अवस्थेत ती शक्यता जास्त होती.
पण पायरिमिडाइन नष्ट होण्याऐवजी त्याच्या रेणूंनी नवे रूप धारण केले. त्यातून आरएनए व डीएनए यांचे घटक अशलेले युरॅसील, सायोसिन व थायमिन हे घटक तयार झाले. पृथ्वीवरील जीवांमध्ये जे जनुकीय पदार्थ असतात, या तीन घटकांचा समावेश होतो.
नासाचे संशोधक ख्रिस्तोफर मॅटेरीझ यांनी सांगितले, की पृथ्वीवर जीवसृष्टीची निर्मिती कशी झाली असावी याबाबत अजून फारशी माहिती नाही. आमच्या या प्रयोगानुसार पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर तेथे अगोदरपासून जीवांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले घटक उपलब्ध होते.