नासाच्या केप्लर अवकाश दुर्बिणीने दोन ताऱ्यांभोवती फिरणारा गुरूसारखा ग्रह शोधला असून तो आतापर्यंत शोधण्यात आलेला विश्वातील सर्वात मोठा खगोलीय घटक असल्याचा दावा करण्यात आला आहे. केप्लर १६४७ बी असे या ग्रहाचे नाव असून तो हंस तारकासमूहात आहे. त्याचा शोध नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर व सॅनडियागो स्टेट युनिव्हर्सिटीच्या खगोलशास्त्रज्ञांनी लावला आहे. केप्लर १६४७ हा ग्रह ३७०० प्रकाशवर्षे दूर असून तो ४.४ अब्ज वर्षे जुना आहे. तो वयाने पृथ्वीइतकाच आहे असे संशोधकांनी म्हटले आहे. तो ज्या ताऱ्यांभोवती फिरत आहे ते सूर्यासारखेच असून त्यातील एक सूर्यापेक्षा मोठा तर एक सूर्यापेक्षा लहान आहे. या ग्रहाचे वस्तुमान व त्रिज्या गुरूइतकी असून तो दोन ताऱ्यांभोवती सापडलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा ग्रह असल्याचा दावा करण्यात आला. जे ग्रह दोन ताऱ्यांभोवती फिरतात त्यांना सरकमबायनरी असे म्हटले जाते.जे ग्रह दोन ताऱ्यांभोवती फिरतात त्यांना सरकमबायनरी असे म्हटले जाते.

केप्लर दुर्बिणीने दिलेल्या माहितीच्या आधारे खगोलशास्त्रज्ञांना असे दिसून आले, की हा ग्रह ताऱ्यासमोरून जातो तेव्हा त्याच्या प्रकाशमानतेत फरक पडतो. त्यामुळे ताऱ्यांचा काही प्रकाश काही प्रमाणात अडतो. एका ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहापेक्षा दोन ताऱ्यांभोवती फिरणारे ग्रह सापडणे अवघड असते, असे एसडीएसयूचे विल्यम वेल्श यांनी म्हटले आहे. ग्रहाचे अधिक्रमण विशिष्ट काळाने नसते, त्यात फरक असतो. हा ग्रह मातृताऱ्यांभोवती फिरण्यास ११०७ दिवस घेतो, म्हणजे हा कालावधी तीन वर्षांचा आहे. आतापर्यंत कुठल्याही बाह्य़ग्रहाचा परिभ्रमण काळ एवढा मोठा नाही. हा ग्रह ताऱ्यांपासून फार लांब आहे. त्यामुळे सरकम बायनरी ग्रह ताऱ्याच्या जवळच्या कक्षेत असतात हा साधारण समज खोटा ठरवणारे हे संशोधन आहे. या ग्रहाची ताऱ्याभोवतीची स्थिती बघता तो वसाहतयोग्य असण्यासाठी ताऱ्यापासून जे अंतर आवश्यक असते तेवढय़ा अंतरावर आहे; म्हणजे तो फिरत असताना पाणी द्रव अवस्थेत राहू शकते. गुरूसारखा हा १६४७ बी ग्रह वायूचा मोठा गोळा असून तेथे जीवसृष्टी शक्य नाही, पण त्याचे चंद्र जर मोठे असतील तर ते जीवसृष्टीस अनुकूल असतात. केप्लर १६४७ बी हा ग्रह महत्त्वाचा आहे कारण मोठा कक्षीय काळ असलेल्या सैद्धांतिक पातळीवर अस्तित्व वर्तवलेल्या ग्रहांपैकी तो एक ग्रह आहे. हे संशोधन अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.