वॉशिंग्टन : नासाने करोना उपचारांसाठी तयार केलेले व्हेंटिलेटर्स  बनवण्याचा परवाना  पुणे,हैदराबाद व बंगळुरू येथील कंपन्यांना देण्यात आला आहे. गंभीर स्वरूपातील करोना रुग्णांसाठी हे व्हेंटिलेटर्स वापरले जातात. भारतातील ज्या कंपन्यांना हा परवाना मिळाला त्यात पुण्याची भारत फोर्ज लि., बेंगळुरूची अल्फा डिझाइन टेक्नॉलॉजीज प्रा. लि. व हैदराबादची मेधा सव्हरे ड्राइव्हज प्रा.लि यांचा समावेश आहे.

भारतीय कंपन्यांशिवाय इतर अठरा कंपन्यांना हे परवाने देण्यात आले असून त्यात आठ अमेरिकी व तीन ब्राझिलियन कंपन्यांचा समावेश आहे. दी नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नासा) ही स्वतंत्र संस्था असून ती अवकाश संशोधनाला वाहिलेली आहे. अमेरिकेतील रुग्णांसाठी दक्षिण कॅलिफोर्नियातील जेट प्रॉपल्शन प्रयोगशाळेत नासाने एक व्हेंटिलेटर तयार केला होता. तेथील अभियंत्यांनी तयार केलेल्या या व्हेंटिलेटरला ‘व्हायटल’ असे म्हटले आहे. एक महिन्यात तो तयार करण्यात आला व त्याला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने ३० एप्रिल रोजी परवानगी दिली होती. व्हायटल म्हणजे ‘व्हेंटिलेटर इंटरव्हेन्शन टेक्नॉलॉजी अ‍ॅक्सेसिबल लोकली’नावाचे उपकरण असून त्याचे सुटे भाग पुरवठा साखळ्यात उपलब्ध आहेत. गंभीर रुग्णांवर उपचारासाठी हा व्हेंटिलेटर वापरला जातो. त्याची रचना लवचीक असून त्यात सुधारणाही करता येतात. जेपीएल कार्यालयातील लिऑन अल्कालाय यांनी सांगितले, की हे तंत्रज्ञान जगभरात उपलब्ध व्हावे अशीच आमची इच्छा आहे. हा व्हेन्टिलेटर डॉक्टरांशी चर्चा करून तयार केला आहे. २३ एप्रिल रोजी त्याची चाचणी घेण्यात आली होती.

व्हायटल व्हेंटिलेटर हा सादृश्यीकरण चाचण्यात यशस्वी  ठरला असून तो गंभीर आजारी करोना रुग्णांना वरदान ठरणार आहे.

– डॉ.तिशा वँग, वैद्यकीय प्रमुख, युसीएलए