नासाच्या छायाचित्रातील माहिती

नासाच्या न्यू होरायझन्स या अवकाशयानाने प्लुटोच्या शॉरॉन या उपग्रहाची वेगळी व अतिशय जास्त विवर्तनक्षमता असलेली छायाचित्रे पाठवली आहेत. या छायाचित्रांवरून तरी शॉरॉन हा गुंतागुंतीचा व स्फोटक भूगर्भीय इतिहास असलेला उपग्रह असल्याचे सूचित होत आहे.

या छायाचित्रात निळा, लाल व अवरक्त असे रंग असून ती या अवकाशयानावरील राल्फ, मल्टीस्पेक्ट्रल व्हिज्युअल इमेजिंग कॅमेऱ्याने टिपली आहेत. रंगांमुळे या उपग्रहाच्या पृष्ठभागावरील बदल अधोरेखित झाले आहेत. शॉरॉनच्या रंगीत छायाचित्रात प्लुटोच्या छायाचित्रांइतकी रंगांची विविधता नाही. उत्तर ध्रुव लाल रंगात दिसत असून त्याचे नामकरण मोर्डर मॅक्युला असे करण्यात आले आहे असे नासाने म्हटले आहे. शॉरॉन हा १२१४ किलोमीटर व्यासाचा असून त्याच्या प्रतिमेचे विवर्तन २.९ किलोमीटर इतके आहे म्हणजे इतक्या लहान भागातील तपशील त्यात दिसू शकतात. शॉरॉनचा व्यास हा प्लुटोच्या निम्मा असून तो ग्रहाच्या तुलनेत उपग्रहाचा आकार मोठा अशा प्रकारचा सौरमालेतील पहिलाच उपग्रह आहे. शॉरॉनच्या वरच्या भागात तुटलेल्या घळया दिसतात व व्हल्कन प्लॅनमची पठारे तळाकडच्या भागात दिसतात. श्ॉरॉनचा १२१४ किलोमीटरचा भाग काही ठिकाणी ०.८ किलोमीटर विवर्तनाने दिसत आहे. दुसऱ्या एका छायाचित्रात श्ॉरॉनच्या विषुववृत्ताच्या उत्तरेकडे काही तडे गेलेले दिसतात व त्यात काही घळयांचा समावेश आहे. यातील मोठी घळी १६०० कि.मी रूंदीची असून श्ॉरॉनचा बराच भाग तिने व्यापला आहे. महा घळीपेक्षा शॉरॉनवरील घळी ही चार पटींनी मोठी असून दोन पट खोल आहे. श्ॉरॉनच्या पृष्ठभागात पूर्वीच्या काळात फार मोठय़ा घडामोडी झालेल्या दिसतात. न्यू होरायझन्सच्या भूगर्भशास्त्र, भूभौतिकशास्त्र व छायाचित्रण विभागाचे कोलोरॅडोतील साऊथवेस्ट रीसर्च इन्स्टिटय़ूटचे वैज्ञानिक जॉन स्पेन्सर यांच्या मते मंगळावरील व्हॅलीज मरिनरीज या घळीसारखीच ही घळ आहे. छायाचित्रातील रंगांवरून प्लुटो व त्याच्या उपग्रहात फरक दिसत असून त्यांचा रंग व प्रकाशमानता यांची तुलना करता येते. प्लुटोचा विषुववृत्तावरील लाल भाग व शॉरॉनचा ध्रुवावरील लाल भाग यांचा त्यात समावेश आहे. श्ॉरॉनच्या घळीवरील दक्षिणेकडील पठारी भाग व्हल्कन प्लॅनम म्हणून ओळखला जातो. तेथे काही विवरे आहेत, उत्तरेकडील विवरे थोडी अलीकडची वाटतात. तेथील पृष्ठभागाचा ताशीवपणा व काही ठिकाणी बनलेले नवे पृष्ठभाग अनेक घडामोडींची साक्ष देतात. तेथे शीतज्वालामुखी (क्रायोव्होल्कॅनिझम) असल्याने तेथील पृष्ठभाग अधिक ताशीव आहे.