युक्रेन प्रश्नावरून अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ने रशियाशी सहकार्यविषयक संबंध तोडले असून केवळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापुरते उभय देशांत सहकार्य राहणार आहे.
युक्रेनच्या सार्वभौमत्व आणि एकतेवर रशियाने केलेले आक्रमण लक्षात घेऊन हे पाऊल उचलत आहोत, असे नासाने बुधवारी जाहीर केले. नासा आणि रशियाची ‘रॉसकॉसमॉस’ ही अंतराळ संस्था यांच्यातील सर्व संबंध संपुष्टात येत असले तरी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मोहिमेपुरते सहकार्य अबाधित राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्यासाठी सोयूझ हे रशियाचे यान हा जगभरातील अंतराळवीरांसमोरचा एकमेव पर्याय आहे. या यानाचा वापर करण्यासाठी अमेरिका प्रत्येक अंतराळवीरामागे रशियाला सुमारे सात कोटी डॉलर देते.