मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या संस्थेच्या वैज्ञानिकांनी मंगळावर ऑक्सिजन निर्मिती करण्याचे ठरवले असून त्यासाठी एक उपकरण इ.स. २०२० मध्ये मंगळावर पाठवण्यात येणार आहे त्याच्या मदतीने तेथे ऑक्सिजन तयार करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
नासाने केलेल्या घोषणेनुसार मंगळावर इ.स. २०२० मध्ये सात उपकरणे पाठवली जातील. १.९ अब्ज किमतीची पृष्ठभागावर फिरू शकेल अशी प्रयोगशाळा तिथे पाठवली जाईल. ही रोव्हरगाडीसारखी प्रयोगशाळा क्युरिऑसिटी या आता तेथे असलेल्या गाडीसारखी असेल.
मॉक्सी हा त्यातील प्रमुख पेलोड असणार असून त्याच्या मदतीने मंगळाचा आणखी शोध घेतला जाईल व ऑक्सिजन तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल. अनेक संशोधकांनी पाठवलेल्या प्रयोगातून या पेलोडची निवड केली आहे. मंगळावर ऊर्जा शोषून त्यानंतर त्यातून ऑक्सिजन निर्माण करणारे हे उपकरण आहे, मंगळावर ९६ टक्के कार्बन डायॉक्साईड आहे. मंगळ २०२० मोहीम यशस्वी झाली तर तेथे मोठय़ा प्रमाणावर ऑक्सिजन तयार केला जाईल, पृथ्वीवर परत येण्यासाठी इंधन म्हणून द्रव ऑक्सिजनची निर्मितीही केली जाईल. मॉक्सी उपकरणाचे प्रमुख संशोधक मायकेल हेश्ट यांनी सांगितले की, मंगळावर उतरण्याची ही मोहीम आमच्या पिढीतील चंद्रावतरणाइतकी महत्त्वाची असेल. मंगळाला मानवी वसाहतीसाठी योग्य करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट असेल असे सांगण्यात आले. मंगळावरील घटक वापरून यात ऑक्सिजन तयार केला जाईल इंधन घटात नेहमी इंधन हे ऑक्सिडीकारक पदार्थाबरोबर गरम केले जाते व त्यातून वीज निर्मिती होते या विरुद्ध प्रक्रिया मॉक्सी उपकरणाने केली जाणार असून दोन स्वतंत्र यंत्रे वापरून मंगळावरील कार्बन डायॉक्साईडपासून ऑक्सिजन व कार्बन मोनॉक्साईड वेगळा केला जाणार आहे त्याला सॉलिड ऑक्साइड इलेक्ट्रोलिसिस असे म्हणतात. पृथ्वीवर इंधन घट चालवणे सोपे असते पण मंगळावर तुम्ही ऑक्सिजनशिवाय काही करू शकत नाही त्यामुळे  तेथे इंजिन चालवायचे असेल तर ७५ टक्के ऑक्सिजन न्यावा लागेल. जेव्हा आपण मंगळावर माणसे पाठवू तेव्हा त्यांना परत पृथ्वीवर आणण्यासाठी रॉकेट उडवावे लागेल ते उडवण्यासाठी या ऑक्सिजनचा वापर करता येईल असे हेश्ट यांनी सांगितले.