अमेरिकेची नासा ही अवकाश संशोधन संस्था न्यूझीलंडमधील एका भागातून मोठा बलून आकाशात सोडणार आहे. वैज्ञानिक प्रयोगाच्या हेतूने सोडण्यात येणाऱ्या बलूनमध्ये सुपर प्रेशर बलून तंत्रज्ञान वापरलेले आहे. त्यामुळे जास्त वजनाचा बलूनही जास्त उंचीवर जाऊ शकतो.

नासाच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिणेकडील वनाका येथून ५३२००० घनमीटरचा हा बलून सोडला जाणार असून त्यात त्याचा कार्यकाल हा शंभर दिवसांचा राहणार आहे. भोपळ्याच्या आकाराचा हा बलून फुटबॉल स्टेडियमएवढा असणार आहे, तो एक एप्रिल रोजी सोडण्यात येईल. सुपर प्रेशर बलून तंत्रज्ञानाच्या मदतीने पॉलिएथिलीनच्या फिल्मचा हा बलून तयार केला असून त्यासाठी ८ हेक्टर पॉलिएथिलीन वापरले आहे. तो किमान ३३.५ कि.मी. उंचीवर जाणार आहे. आकाशात गेल्यानंतर तो पूर्वेकडे सरकत जाईल त्यावर १०२५ किलोचा पेलोड असणार आहे, पेलोड याचा अर्थ वैज्ञानिक उपकरणे असा मानला जातो त्यात दळणवळण व इतर वैज्ञानिक उपकरणांचा समावेश असून हा बलून पृथ्वीला तीन आठवडय़ात एक प्रदक्षिणा पूर्ण करील, अर्थातच हा कालावधी स्ट्रॅटोस्फिअरमधील वारयाच्या वेगावर अवलंबून असणार आहे. सध्या सुपर प्रेशर बलून तंत्रज्ञानाने ५४ दिवसांचा विक्रम केलेला असून तो २००९  मधील आहे.

असा आहे बलून

  • आकारमान ५३२००० घनमीटर
  • आकार भोपळ्यासारखा
  • ८ हेक्टर पॉलिएथिलीनचा वापर

*  उंची ३३.५  कि.मी.

  • १०२५ किलोचा पेलोड (वैज्ञानिक उपकरणे)
  • अपेक्षित कालावधी १०० दिवस
  • यापूर्वीचा विक्रम ५४  दिवस
  • सुपर प्रेशर बलून तंत्रज्ञानाचा वापर