अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेचे मेसेंजर हे अवकाशयान सौरमालेच्या खूप आतल्या भागात गेले काही वर्षे फिरत असून त्याचे इंधन संपल्याने ते आता बुध ग्रहावर कोसळणार आहे. नासाच्या मक्र्युरी सरफेस स्पेस एनव्हरॉन्मेंट, जिओकेमिस्ट्री अँड रेंजिंग(मेसेंजर) हे अवकाशयान २००४ मध्ये सोडण्यात आले होते ते आता येत्या ३० एप्रिलला बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर कोसळणार आहे.
हे अवकाशयान बुधावर सेकंदाला ३.९१ कि.मी वेगाने कोसळणार असून ते पृथ्वीच्या विरूद्ध दिशेला असलेल्या भागात आहे त्यामुळे येथून त्याचे निरीक्षण करणे कठीण आहे किंवा कोणत्या भागात ते कोसळेल हेही सांगणे कठीण आहे.
या आठवडय़ात मेरीलँड येथील लॉरेल येथे असलेल्या जॉन हॉपकिन्स अ‍ॅप्लाईड फिजिक्स लॅबोरेटरीच्या वैज्ञानिकांनी त्याची कक्षा सुधारण्याचा चौथा प्रयत्न केला, हे अवकाशयान उशिराने तेथे कोसळावे यासाठी वैज्ञानिकांनी कक्षा बदलण्याचे प्रयत्न केले. २४ एप्रिलला कक्षा बदलण्याचा शेवटचा प्रयत्न करण्यात येणार असून त्यानंतर यानातील इंधन संपल्याने त्यावरचे नियंत्रण सोडून देण्यात येणार आहे.
त्या अवस्थेत अवकाशयान सूर्यामुळे असलेल्या गुरूत्वाला विरोध करू शकणार नाही त्यामुळे ते या ग्रहावर कोसळेल. बुध हा पृथ्वीच्या शेजारी ग्रह असला तरी त्याच्याबाबत आपल्याला मेसेंजर मोहिमेच्या आधी फार कमी माहिती होती. हे यान कोसळल्यानंतर ही मोहीम संपुष्टात येणार असून त्यातील माहितीचे विश्लेषण केल्यानंतर अनेक वैज्ञानिक कोडी उलगडणार आहेत, असे नासाच्या वॉशिंग्टन येथील मुख्यालयाचे सहायक प्रशासक जॉन ग्रन्सफेल्ड यांनी सांगितले. या अवकाशयानाने साडेसहा वर्षे प्रवास केला असून ते १८ मार्च २०११ रोजी बुधाच्या कक्षेत गेले. त्याचा मुख्य उद्देश ग्रहाला प्रदक्षिणा करून एक वर्षभर माहिती पृथ्वीकडे पाठवणे हा होता. यानातील इंधन लगेच संपले नाही त्यामुळे त्याने चार वर्षे अधिक काम केले.