पंतप्रधान नरेंद्र मोदी व महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे एकाच विचारसरणीचे आहेत अशी टिका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. केरळमधील वायनाड या आपल्या मतदारसंघात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते आले होते. “भारतीयांना भारतीय असल्याचे सिद्ध करण्यासाठी मोदी भाग पाडत आहेत. मोदींमध्ये प्रचंड प्रमाणात राग भरलेला असून प्रत्येकानं आपल्याला पटेल तो धर्म पाळावा हे गांधींचं तत्त्व मोदींच्या लक्षात येत नाही,” अशी टिका राहुल यांनी केली आहे.

“आज ज्याला या कायद्याबद्दल फारशी माहिती नाही तो ही मोदींना आव्हान देत आहे. मोदींमध्ये इतका राग भरलेला आहे की त्यांना भारताचं शक्तिस्थानच समजत नाहीये. मोदींची व गोडसेची दोघांची विचारसरणी एकच आहे. त्यांच्या विचारसरणीत काहीही फरक नाही. दोघांमध्ये फरक इतकाच आहे की गोडसेची विचारसरणी आपल्याला मान्य असल्याचे सांगण्याची धमक मोदींमध्ये नाही,” राहुल गांधी म्हणाले.

भारतीयांना भारतीय असल्याचे सिद्ध करण्यास भाग पाडण्यात येत असून भारतीय कुणाला म्हणायचं हे ठरवणारे नरेंद्र मोदी कोण? असा सवाल राहुल गांधींनी विचारला. माझं भारतीयत्व विचारण्याचा अधिकार मोदींना कुणी दिला? असं विचारत मी भारतीय आहे हे मला माहितेय आणि ते कुणाला सिद्ध करून दाखवण्याची गरज नाही असे राहुल म्हणाले. त्याचप्रमाणे १.४ अब्ज भारतीयांना ते भारतीय असल्याचे सिद्ध करून दाखवण्याचीही गरज नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.