राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्या प्रकरणावरुन आता भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विरुद्ध हिंदू महासभा यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगली आहे. महात्मा गांधींच्या हत्या प्रकरणात न्यायालयाच्या मदतीसाठी अमायकस क्युरीची (न्यायमित्र) नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, संघ आणि भाजपने यापासून दूर रहावे, असा इशारा हिंदू महासभेने दिला आहे. या प्रकरणातील गुंतागुंत वाढवण्यासाठी संघ आणि भाजपकडून जाणूनबुजून बंदुकीतील चौथ्या गोळीचा उल्लेख केला जात आहे, असा आरोप हिंदू महासभेने केला आहे.

‘हिंदू महासभेच्या नथुराम गोडसेने बापूंची हत्या केली होती, हे सर्वांना माहिती आहे. हा आमचा वारसा आहे. भाजप आणि संघ आमच्याकडून हा वारसा हिरावून घेऊ शकत नाही,’ असे हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक शर्मांनी म्हटले. ‘हत्येदरम्यान चौथी गोळी झाडण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करुन संघ आणि भाजपकडून संशय निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरुन मुखवटा दूर करण्याची वेळ आली आहे. नथुराम गोडसेंचे हिंदू महासभेशी अतूट नाते होते. मात्र, आता गोडसेंना बाजूला सारुन संघ आणि भाजपकडून महात्मा गांधींच्या हत्येचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे,’ असा आरोपही त्यांनी केला. ‘गोडसेंना बाजूला केल्यावर महासभेचे महत्त्व कमी होईल, याची त्यांना कल्पना आहे. मात्र, आम्ही असे होऊ देणार नाही,’ असेही त्यांनी म्हटले.

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येच्या फेरतपासासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयाच्या मदतीसाठी अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अमरेंद्र शरण यांना न्यायमित्र (अमायकस क्युरी) म्हणून नेमले आहे. ‘महात्मा गांधींची हत्या एका संशयित व्यक्तीने केली होती. याच व्यक्तीने गांधींवर चौथी गोळी झाडली होती,’ असा दावा ‘अभिनव भारत’चे संस्थापक पंकज फडणीस यांनी केला होता.