भोळ्याभाबडय़ा भक्तांच्या विश्वासाचा फायदा घेऊन कोटय़वधी रुपयांची मालमत्ता कमावणाऱ्या भारतीय वंशाच्या हिंदू धर्मगुरूला अमेरिकेच्या न्यायालयाने बँक घोटाळ्यात दोषी ठरवले. त्याच्यावर काळा पैसा चलनात आणल्याचा, तसेच जॉर्जिया येथील मंदिराचा विश्वस्त म्हणून मिळालेला पैसा स्वत:च्या कुटुंबीयांची हौसमौज पूर्ण करण्यासाठी वापरल्याचे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत. अण्णामलाई अण्णामलाई असे या हिंदू धर्मगुरूचे नाव आहे. तो याआधी कमांडर सेल्वम या नावाने आपल्या भक्तांना फसवत होता. दोन आठवडे चाललेल्या सुनावणीनंतर त्याला दोषी ठरवण्यात आले. त्याच्यावर ३४ प्रकरणांमध्ये आरोप ठेवण्यात आले होते.

मायावती यांना सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
नवी दिल्ली: बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या अवैध मालमत्तेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तीन आठवडय़ांत आपले उत्तर देण्याचा आदेश मंगळवारी दिला. यासंदर्भात नव्याने प्राथमिक आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागास (सीबीआय) देण्यात यावेत, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयापुढे दाखल करण्यात आली होती. सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांनी या प्रकरणाची सुनावणी पाच आठवडय़ांसाठी पुढे ढकलून मायावतींच्या उत्तराबरोबरच उत्तर दाखल करण्याची सूचना अर्जदारांना केली. यासंदर्भात मायावती यांच्या विरोधात नव्याने प्राथमिक आरोपपत्र का दाखल करण्यात आले नाही, अशीही विचारणा न्यायालयाने सीबीआयला केली.

भारत-पाक सीमेनजीक लोकांच्या रात्रीच्या वर्दळीवर बंदी
जैसलमेर: शेजारील राष्ट्रांकडून होणारी घुसखोरी लक्षात घेता जैसलमेर जिल्हा प्रशासनाने येत्या १ जानेवारी २०१५ पर्यंत सायंकाळी ६ ते सकाळी ७ या वेळेत भारत-पाक सीमेनजीक होत असलेल्या लोकांच्या वर्दळीवर बंदी घातली आहे. जैसलमेरचे जिल्हाधिकारी एन. एल. मीना यांनी यासंदर्भात एक आदेश जारी केला आहे. सीमेपासून ५ किलोमीटर अंतरावर लोकांची वर्दळ सायंकाळी ६ ते सकाळी ७ या वेळेत होणार नाही, असे आदेशात स्पष्ट  करण्यात आले आहे. या काळात आणि वेळेत लोकांना सीमेनजीक फिरता येणार नाही. तसे बंदी आदेश काढण्यात आले आहेत.

शहीदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख
लखनौ: जम्मू-काश्मीरमध्ये वेगवेगळ्या चकमकीत शहीद झालेल्या उत्तर प्रदेशातील दोन जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा मंगळवारी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी येथे केली. शहीद नीरजकुमार आणि राहुल कुमार या दोन जवानांना अखिलेश यांनी श्रद्धांजली अर्पण केली. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोघे जवान शहीद झाले होते. या दोघांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याचे सरकारी प्रवक्त्याने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

छेडछाडीला कंटाळून दोन मुलींची आत्महत्या
चंडिगड: तरुणांच्या एक गटाकडून वारंवार होत असलेल्या छेडछाडीला कंटाळून दोन अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याची घटना रोहटक जिल्ह्य़ात घडली. आत्महत्या केलेल्या एका मुलीने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आरोपीचे नाव आढळल्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक करण गोयल यांनी सांगितले. आत्महत्या केलेली एक मुलगी सहावीत शिकत होती, तर दुसरी सातवीत होती. शिकवणी वर्गात दोघीही बेशुद्धावस्थेत आढळल्याने त्यांना नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. महाविद्यालयातून काढून टाकण्यात आलेल्या १९ वर्षांच्या एका युवकाला याप्रकरणी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दंगेखोरांना पकडण्यासाठी इनाम
मुझफ्फरनगर: गेल्या वर्षी मुझफ्फरनगरमधील फुगना व लांक या खेडय़ात झालेल्या दंगलीतील सहा सामूहिक बलात्कार प्रकरणातील २२ फरारी आरोपींना पकडण्याच्या प्रयत्नांचा भाग असून त्यांच्याबाबत माहिती देणाऱ्यांना अडीच हजार रुपये रोख इनाम देण्यात येईल असे पोलिसांनी जाहीर केले आहे.वरिष्ठ पोलीस अधीक्षक एच. एन. सिंग यांनी सांगितले की, अडीच हजार रुपयांचे इनाम सहा सामूहिक बलात्कारातील २२ आरोपींबाबत माहिती देणाऱ्यांना दिले जाईल आरोपी त्या घटनेनंतर फरारी आहेत.

‘अल्पवयीनांना ई-सिगारेट विकू नका’
जिनिव्हा: ई-सिगारेट धोकादायक नसल्याचा निर्वाळा अनेक धूम्रपानप्रेमींकडून दिला जात असला तरी तरुण पिढीला या आधुनिक धूम्रपानाचा मोठा धोका आहे. तरुण पिढी या व्यसनाला बळी पडू नये म्हणून अनेक देशांनी अल्पवयीन मुलांना ई-सिगारेट विकण्यास बंदी आणावी, अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. ई-सिगारेटची रचना आधुनिक पद्धतीने करण्यात आल्याचे सांगितले.