प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राज्यातील सर्व मदरशांवर राष्ट्रध्वज फडकाविण्यात येईल याची राज्य सरकारने खबरदारी घ्यावी, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्या. यशवंत वर्मा यांच्या पीठाने सदर आदेश दिला. या बाबत राज्य सरकारने आवश्यक ते आदेश जारी करावे, असेही पीठाने म्हटले आहे.अलिगढ येथील रहिवासी अरुण गौर यांनी केलेल्या जनहित याचिकेवर पीठाने हा आदेश दिला. मदरशांमध्ये २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज फडकाविण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश द्यावे, अशी याचिकेत विनंती करण्यात आली होती.
कलबुर्गी हत्येच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके
बंगळुरू : ज्येष्ठ कन्नड विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांनी चार पथके स्थापन केली आहेत. कलबुर्गी यांची रविवारी धारवाडमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.या हत्येच्या तपासासाठी चार पथके स्थापन करण्यात आली असून ती महाराष्ट्रातही तपास करणार आहेत, असे हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त पी. एच. राणे यांनी सांगितले. महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ.गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आली होती, त्यांचा कलबुर्गी यांच्या हत्येशी संबंध आहे का, असे विचारले असता राणे म्हणाले की, आम्ही गंभीरतेने याचा तपास करीत आहोत.कलबुर्गी हत्येचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने सोमवारी जाहीर केला. दरम्यान, गुन्हा अन्वेषण विभागही तपास करणार असल्याचे स्पष्ट केले होते.
बँकॉक स्फोटातील मुख्य संशयिताला अटक
बँकॉक- थायलंडमधील ब्रह्मा मंदिरात घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी दुसऱ्या परदेशी नागरिकाला, मुख्य संशयिताला कंबोडियाच्या सीमेवर अटक करण्यात आली आहे, असे पंतप्रधान प्रयुत चान-ओ-चा यांनी मंगळवारी जाहीर केले. थायलंडमधील सा केइयो प्रांतातील बान पा राय सीमेवर एका संशयिताला अटक करण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्याची चौकशी सुरू असून तो मुख्य संशयित आणि परदेशी नागरिक आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. मात्र त्यांनी संशयित कोणत्या देशाचा आहे ते स्पष्ट केले नाही. पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला एक इसम प्रार्थनास्थळाच्या मागील बाजूला एक बॅग ठेवून जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्या बॅगेत बॉम्ब होता असे सांगण्यात येते. या स्फोटात २० जण ठार झाले होते तर १०० हून अधिकजण जखमी झाले होते.सदर संशयित सीमेवरून कंबोडियात जाण्याच्या तयारीत असताना सैनिक आणि पोलिसांना आढळला. सीमेवरील जंगलाच्या भागांत पाठीवर बॅग घेऊन तो जात होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ज्या इसमाचा चेहरा दिसत होता तसाच चेहरा संशयिताचा असल्याचे पोलिसांना आढळले.
नर्तिका गुलाबोच्या फार्म हाऊसमध्ये  रेव्ह पार्टीवर छापा
जयपूर- येथून जवळच असलेल्या सिकर रोडवर प्रसिद्ध कॅलबेलिया नर्तिका गुलाबो हिच्या फार्महाऊसवर चालू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी २७ जणांना अटक केली. गुलाबो हिचा मुलगा व फिनलंडच्या एका महिलेचा समावेश या पार्टीत होता. रेव्ह पार्टीच्या ठिकाणी मारिजुआना व हशीश तसेच इतर मादक औषधे सापडली. सिकर महामार्गावर फार्महाऊसवर ही रेव्ह पार्टी चालू असताना सिगारेट्स व इतर अमली पदार्थाचा यथेच्छ वापर सुरू होता.  पहाटे चार वाजता पोलिसांना या रेव्ह पार्टीची माहिती मिळाली, त्यानंतर पोलिस निदाद खेडय़ात गुलाबो हिच्या फार्महाऊसवर गेले. तेथे तिचा मुलगा व इतर २७ जणांना अटक झाली, असे अतिरिक्त पोलिस उपायुक्त करण शर्मा यांनी सांगितले.
अरुणाचल प्रदेशातील पूरस्थिती गंभीर
इटानगर- अरुणाचल प्रदेशातील मोठय़ा नद्यांना पूर आल्याने येथील स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालली असल्याने प्रशासनाला नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागत आहे. लोहित, नामसई, निम्न दिबांग खोरे, कुरुंग कुमी, पूर्व सियांग हे जिल्हे सर्वाधिक बाधित झाले असून मुसळधार पावसामुळे दरडी कोसळल्याने अंजाव जिल्ह्य़ाचा देशाशी असलेला संपर्क तुटला आहे. दिबांग नदीला आलेल्या पुरामुळे दंबूक उपविभागातील ३४ घरे वाहून गेली आहेत, असे अतिरिक्त उपायुक्त अतुल तायेंग यांनी सांगितले. कुरुंग कुमी जिल्ह्यातील चांबांग येथील बेटे नदीत दोन जण वाहून गेले आहेत. लोहित जिल्ह्य़ातील परशुरामकुंड आणि तेझू यामध्ये दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत.