तागाच्या गिरणीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या हत्येला भाजप आणि डावे पक्ष जबाबदार आहेत, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. हुगळी जिल्ह्य़ातील एका कारखान्याचे अधिकारी एच. के. महेश्वरी हे कामगारांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी आले असता त्यांना मारहाण करण्यात आली. त्यातच ते दगावले, असा आरोप ममतांनी केला. माकप आणि भाजपच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा दावा ममतांनी केला. या कारखान्यात तृणमूलची संघटना नाही. त्यामुळे आमचा काहीच संबंध नाही, असे ममतांनी स्पष्ट केले. भाजप नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे केल्याचा आरोप ममतांनी केला. भाजपने मात्र ममतांचे आरोप फेटाळले आहेत.
भाजप खासदार साध्वी निरंजन ज्योती यांच्यावर हल्ला
फतेहपूर: भाजपच्खासदार साध्वी निरंजन ज्योती यांच्यावर तीन जणांनी हल्ला केला. सुदैवाने त्यात त्यांना काही झाले नाही, हल्लेखोर पळून गेले असे पोलिसांनी सांगितले. खासदार साध्वी निरंजन ज्योती या आवास विकास कॉलनी येथील कार्यक्रमाहून परत जात असताना हा हल्ला करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.निरंजन ज्योती यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपण कार्यक्रमाहून परत येत असताना भानू पटेल व त्याच्या तीन सहकाऱ्यांनी आपल्यावर हल्ला केला व गोळ्या झाडल्या. त्या म्हणाल्या की, त्यांचा अंगरक्षक राहुल तिवारी हा गंभीर जखमी झाला असून इतर हल्लेखोरांचा स्थानिकांनी पाठलाग केला. भानू पटेल याला पोलिसांनी अटक केली आहे.
राज्यसभा निवडणुकीत भाजपचे फोडाफोडीचे राजकारण – चौधरी
 पाटणा: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप घोडेबाजाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप संयुक्त जनता दलाने केला आहे. १८ जूनला होणाऱ्या या निवडणुकीसाठी भाजप अजूनही आपली भूमिका का स्पष्ट करत नाही, असा सवाल जलस्रोत मंत्री विजयकुमार चौधरी यांनी केला.भाजपच्या पाठिंब्याखेरीज दोन अपक्ष रिंगणात उतरणे शक्य नाही, असा दावा केला.
ममतांची भाजपला धमकी
कोलकाता : पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांमागील कारणे शोधण्यासाठी भाजपने समिती पाठविल्याने ममता बॅनर्जी उद्विग्न झाल्या आहेत. आपणही भाजपशासित राज्यांमध्ये आपल्या खासदारांना पाठवू अशी धमकी त्यांनी दिली आहे. जर यापुढे तृममूल काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात भाजपशासित राज्यांमध्ये एखादी हिंसक घटना जरी घडली तरीही आपण स्वस्थ बसणार नाही, आपण आपल्या केंद्रीय समितीस तेथे चौकशी करण्यासाठी पाठवू, असा इशारा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.
तिघा बांगलादेशी घुसखोरांना अटक
कोलकाता  : वैध कागदपत्रांविना भारतात आलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना  रविवारी अटक करण्यात आली व त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. नूर हुसेन, झमान, सलिम हे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांना बाहुहाती येथे कैथली भागात पकडण्यात आले. त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
वाराणसीत १४५ किलो अमोनियम नायट्रेट जप्त
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या मतदारसंघातून निवडून आले आहेत त्या उत्तर प्रदेशातील वाराणसीत अमोनियम नायट्रेटचा १४५ किलोचा साठा सापडला आहे. दाफी येथे एका मोटारीत हा साठा सापडला असे पोलिसांनी सांगितले. लंका पोलीस स्टेशन अंतर्गत राष्ट्रीय महामार्गावर भेलूपूर भागात एका वाहनांची तपासणी सुरू असताना एका अलाहाबाद येथून आलेल्या मोटारीत हा साठा सापडला. चालक मोटार शेजारच्या गल्लीत टाकून पळून गेला, असे पोलीस अधिकारी शालिनी यांनी सांगितले.
बदाऊनमध्ये बलात्काराचे सत्र सुरूच
बदाऊन : उत्तर प्रदेशात अलीकडेच बलात्काराच्या घटनांमुळे अगोदरच बदनाम झालेल्या बदाऊन भागात बिसौली येथे एका पस्तीस वर्षांच्या महिलेला दोन मुलांसह कोंडून ठेवून तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला. त्यात पोलिसाच्या मुलाचाही समावेश आहे असे पोलिसांनी सांगितले. सदर महिला शुक्रवारी रात्री ती औषधे आणण्यासाठी गेली असता हिमांशू, पोलिसाचा एक मुलगा यांनी तिला मुलांसह कुलूप लावून घरात कोंडले व नंतर दोघांसह परत आले. नंतर त्यांनी या महिलेवर बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.
अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशनवर भारतीय वैज्ञानिकाची नेमणूक
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतीय-अमेरिकी वैज्ञानिक सेतुरामन पंचनाथन यांची नेमणूक त्यांच्या प्रशासनात विज्ञान खात्यातील एका प्रमुख पदावर केली आहे. पंचनाथन हे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेसचे माजी विद्यार्थी असून त्यांना नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या नॅशनल सायन्स बोर्डचे सदस्य नेमण्यात आले आहे, असे व्हाईट हाऊसच्या निवेदनात म्हटले आहे. १९८१ मध्ये ते मद्रास विद्यापीठाच्या विवेकानंद कॉलेजमधून पदवीधर झाले.