उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जेव्हापासून भगवान हनुमान दलित असल्याचे म्हटले, तेव्हापासून एक नवा वाद सुरु झाला आहे. आता याप्रकरणात अनुसूचित जमाती (एसटी) आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी उडी घेतली असून हनुमान दलित नव्हे तर आदिवासी होते, असा दावा त्यांनी केला आहे. यासाठी त्यांनी काही उदाहरणेही दिली आहेत.

ते म्हणाले, अनुसूचित जमातीमध्ये हनुमान गोत्र असते. उदाहरणार्थ तिग्गा. कुडुकमध्ये तिग्गा आहे. तिग्गाचा अर्थ वानर. आमच्याकडे काही जमातींमध्ये साक्षात हनुमान गोत्र आहे. अनेक ठिकाणी गिधाड गोत्र आहे. त्यामुळे आम्ही अपेक्षा करतो की, ज्या दंडकारण्यमध्ये भगवान राम यांनी सैन्याचे एकत्रीकरण केले होते. यामध्ये अनुसूचित जमाती समूहाचे लोक होते. त्यामुळे हनुमान दलित नव्हे तर अनुसूचित जमातीचे होते.

दरम्यान, राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील मलखेडा येथे मंगळवारी एका प्रचारसभेत योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे आदिवासी, जंगलात फिरणारे, दलित आणि वंचित होते. त्यांनी पूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण सर्व भारतीय समाजाला जोडण्याचे काम केले होते, असे म्हटले होते. जे लोक राम भक्त आहेत ते भाजपाला मतदान करतील आणि जे रावणाची पूजा करतात ते काँग्रेसला मदतान करतील असेही म्हणाले होते.