News Flash

हैदराबादमध्ये महिलेला जाळल्याप्रकरणी चौकशी

राष्ट्रीय महिला आयोगाकडून समिती नियुक्त

| November 30, 2019 03:03 am

प्रतिनिधिक छायाचित्र

राष्ट्रीय महिला आयोगाकडून समिती नियुक्त

नवी दिल्ली : हैदराबाद येथे लैंगिक अत्याचार करून महिला पशुवैद्यकास (वय२७) पेटवून ठार करण्यात आल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने एक समिती नेमली आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे, की या प्रकरणी दोषी व्यक्तींना शिक्षा करण्यासाठी आयोग कुठलीही कसूर ठेवणार नाही. राज्य सरकारच्या रुग्णालयात सहायक पशुवैद्यक  असलेल्या या महिलेला पळवून नेण्यात आले व नंतर जिवंत जाळून मारण्यात आले होते. ही घटना बुधवारी घडली. सायबराबादचे पोलिस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांना पाठवलेल्या पत्रात शर्मा यांनी म्हटले आहे, की या घटनेचे वृत्त ऐकून आम्ही व्यथित झालो आहोत. महिलांच्या सुरक्षेबाबत आम्हाला चिंता वाटते. आता या प्रकरणी  चौकशी समिती नेमण्यात आली असून या प्रकरणात पोलिसांनी गांभीर्याने लक्ष घालावे. या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी काय कारवाई केली याचा अहवाल सादर करावा.

हैदराबाद येथे गुरुवारी एका नाल्याजवळ सत्तावीस वर्षांच्या महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. तत्पूर्वी ती बेपत्ता झाल्याची तक्रार होती.

तिच्या लहान बहिणीने याबाबत पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत असे म्हटले होते, की तिच्या बहिणीचा बुधवारी रात्री ९.२२ वाजता फोन आला होता. ती टोल नाक्यावर अडकून पडली असून कुणीतरी तिला तिच्या स्कूटरचे टायर पंक्चर असल्याचे सांगून मदतीचा प्रयत्न केला.

नंतर या सगळ्या प्रकारात मदतीच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार करून तिला जाळून टाकल्याचे निदर्शनास आले.

मार्गदर्शक तत्त्वे जारी

केंद्र सरकारने महिलाविरोधी गुन्ह्य़ांबाबत राज्य सरकारांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून हैदराबादमध्ये महिलेला जिवंत जाळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही करण्यात आली. केंद्रीय गृह राज्य मंत्री जी. के. किशन रेड्डी यांनी सांगितले, की आम्ही तेलंगण सरकारच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत. जे कुणी या महिलेला जिवंत जाळण्यात सामील असतील त्यांची गय केली जाणार नाही. आता यापुढे सर्वच राज्यांनी महिलांविरोधात असे गंभीर गुन्हे होणार नाहीत याची काळजी घेण्याची गरज आहे. तेलंगणचे पोलिस महासंचालक दिल्लीत येत असून त्यांना आपण भेटणार आहोत. जे लोक या गुन्ह्य़ात सामील असतील त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालावा, त्यांचे वकीलपत्र कुणी घेऊ नये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 3:03 am

Web Title: national commission for women hyderabad veterinary doctor murder case zws 70
Next Stories
1 माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कुमारस्वामी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा
2 लंडन ब्रिजवर हल्ल्यात अनेक जण जखमी
3 सुप्रसिद्ध मल्याळी कवी अक्किथम यांना ‘ज्ञानपीठ’
Just Now!
X