नॅशनल कॉन्फरन्सचे नेते त्रिलोचन सिंग वजीर हे दिल्लीतील एका फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले आहेत. वजीर यांचा मृतदेह आज (९ सप्टेंबर) सकाळी पश्चिम दिल्लीतील मोतीनगर येथील तिसऱ्या मजल्याच्या फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेचे माजी आमदार असलेले ६७ वर्षीय वजीर हे ३ सप्टेंबरपासून बेपत्ता होते. शेजाऱ्यांकडून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी फ्लॅटची तपासणी केली. तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. यावेळी पोलिसांच्या लक्षात आलं की दरवाजा बाहेरून लावलेला आहे.

मृतदेहाशेजारी पडलेल्या मोबाईलमुळे पोलिसांना वजीर यांची ओळख पटण्यास मदत झाली. त्रिलोचन सिंग वजीर १ सप्टेंबर रोजी दिल्लीत आले होते. ३ सप्टेंबर रोजी कॅनडाला जाणारं विमान पकडणार होते. परंतु, ते विमानतळावर पोहोचलेच नाहीत. तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की फॉरेन्सिक तपासणीनंतरच वजीर यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे स्पष्ट होईल. तर सध्या वजीर यांचा फोन हा त्यांचा शेवटचा कॉल यांसह अन्य काही तपशीलांसाठी तपासला जात आहे. याचसोबत, दोन भाडेकरूंची देखील चौकशी सुरु आहे. मात्र, वजीर त्या फ्लॅटमध्ये का गेले असावेत? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मी हादरलो आहे!

जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून आपल्या पक्षातील सहकाऱ्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “माझे सहकारी सरदार टी.एस. वजीर, विधानपरिषदेचे माजी सदस्य यांच्या अचानक मृत्यूच्या धक्कादायक बातमीने मी हादरलो आहे. काही दिवसांपूर्वीच आम्ही जम्मूमध्ये एकत्र बसलो होतो. तेव्हा मला कल्पना नव्हती की ही आमची शेवटची भेट ठरणार आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो”, असे ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, त्रिलोचन सिंग वजीर यांचा मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत सध्या पोलिसांकडून तपास सुरु आहे. त्यामुळे, लवकरच या घटनेचा उलगडा होण्याची अपेक्षा आहे.