पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा पाकिस्तानचा भाग असून पीओकेला पाकपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे वादग्रस्त विधान जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. काश्मीर प्रश्नावर भारताने पाकिस्तानशी चर्चा करावी, असा सल्लाही त्यांनी मोदी सरकारला दिला आहे.

नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाचे नेते आणि जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भारताकडे जम्मू-काश्मीर असून तो भारताकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे पाकव्याप्त काश्मीर हे पाकिस्तानच्या ताब्यात आहे आणि तो भाग पाककडून हिरावून घेऊ शकत नाही, हेच वास्तव आहे आणि ते स्वीकारले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांमधील काश्मीरच्या जनतेला स्वायत्तता देण्याची गरज आहे. स्वातंत्र्याची मागणी करणे ही बेईमानी आहे. त्यामुळे स्वातंत्र्याची मागणी करणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने नेमलेले संवादक दिनेश्वर शर्मा यांच्या नियुक्तीवर अब्दुल्ला म्हणाले, मी यावर फार भाष्य करणार नाही. पण हा वाद भारत आणि पाकिस्तानमध्ये आहे. काश्मीरचा काही भाग पाकिस्तानकडेही आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानशीही चर्चा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा निर्णय घेण्याची गरज असल्याचे ते म्हणालेत. भारताने काश्मीरला धोका दिला, आम्ही भारताला का निवडले याचे महत्त्वच भारताला कळाले नाही, त्यामुळे काश्मीरमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली, असा आरोप त्यांनी केला.

फारुख अब्दुल्लांच्या विधानाने वाद निर्माण झाल्याची ही पहिलीच वेळ नाही. चीन किंवा पाकिस्तानपेक्षा भारतात बसलेल्या लोकांकडूनच देशाला धोका आहे. हे दोन्ही देश भारताचे काहीच बिघडवू शकत नाहीत. खरा चोर तर आपल्या देशातच बसला आहे, असे विधान त्यांनी केले होते. सर्जिकल स्ट्राईकशी आम्हाला काही घेणे देणे नाही, आम्हाला शांतता महत्त्वाची आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिल्याने वाद निर्माण झाला होता.