2017 सालातील ‘कोर्ट’ हा सिनेमा चांगलाच गाजला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेल्या या सिनेमातील वीरा साथीदार यांचं करोनाने निधन झालं आहे. ‘कोर्ट’ या सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. वीरा साथीदार यांनी १९ मार्चला करोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती. १० दिवसानंतर ते करोना संक्रमित झाले. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कोर्ट सिनेमात पहिल्यांदा अभिनय
वीरा साथीदार यांनी कोर्ट सिनेमात पहिल्यांदा अभिनय केला. ‘कोर्ट’ सिनेमासाठी दोनशे लोकांचं ऑडीशन घेण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर सिनेमातील मुख्य भूमिकेसाठी वीरा साथीदार यांना विचारण्यात आलं आणि त्यांनी होकार दिला. यापूर्वी आंबेडकर चळवळीत वीरा साथीदार सामिल झाले होते. त्यामुळे चळवळ सोडून अभिनयात तुम्ही तग धरू शकणार नाही अशी टीका अनेकांनी त्यांच्यावर केली होती. मात्र हा सिनेमा लोकप्रिय ठरला. या सिनेमाने अनेक पुरस्कार पटकावत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरलं. एवढचं नाही तर सिनेमाने ऑस्करपर्यंत मजल मारली. ‘बेस्ट फॉरेन फिल्म’ या श्रेणीत ‘कोर्ट’ सिनेमाची निवड झाली होती.शिवाय सिनेमातील वीरा साथीदार यांच्या अभिनयाच भरपूर कौतुक झालं. या सिनेमात नारायण कांबळे ही मुख्य भूमिका त्यांनी साकारली होती.

ऑस्कर निवडीनंतर लोकसत्तासोबत शेअर केल्या होत्या भावना

‘कोर्ट’ सिनेमाची ऑस्करसाठी निवड झाल्यानंतर वीरा साथीदार यांनी लोकसत्ता कार्यालयाला भेट देऊन मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. यावेळी ते म्हणाले होते, ” सामाजिक चळवळीत काम करणारा वीरा साथीदार कधी चित्रपटात काम करेल असे स्वप्नातही कधीही वाटले नाही आणि तो माझा पिंड नव्हता. गुराखीपासून शेतकरी, कामगार, मजूर, रिक्षाचालक, पत्रकार, कार्यकर्ता अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना अभिनेता होऊ असे कधीही वाटले नाही. नवीन पिढीतील कलावंतांनी या क्षेत्रात काम करीत असताना स्वतची वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे, तसा अभिनय केला पाहिजे. केवळ एखाद्या कलावंतांची नक्कल करून अभिनय शिकता येत नाही. तो गुण अंगी असावा लागतो.” असं ते म्हणाले होते.