24 February 2021

News Flash

वर्णभेदी भूमिका पोसल्याची ‘नॅशनल जिऑग्राफिक’ची कबुली

या मासिकाने हे कठोर आत्मपरीक्षण केले आहे.

आपल्या अवतीभवती पसरलेल्या आणि सरावाने आपण जिला नित्य परिचयाची मानतो अशा सृष्टीची आणि मानवी संस्कृतीची विविध ज्ञात-अज्ञात रूपे गेली तब्बल १३० वर्षे मांडणाऱ्या ‘नॅशनल जिऑग्राफिक’ या जगप्रतिष्ठित मासिकाने खऱ्या अर्थाने कात टाकली आहे. आम्ही आजवर प्रकाशित केलेले अनेक शोधलेख हे वर्णभेद आणि वर्णद्वेषाचेच समर्थन करणारे होते, अशी जाहीर कबुलीच या मासिकाने दिली आहे. एप्रिल २०१८चा या मासिकाचा अंक हा ‘वर्णभेद’ या विषयालाच वाहिलेला असून त्यानिमित्त या मासिकाने हे कठोर आत्मपरीक्षण केले आहे.

या मासिकाच्या मुख्य संपादिका सुसान गोल्डबर्ग यांनी व्हर्जिनिया विद्यापीठाचे जॉन एडविन मेसन यांना या कामी सहभागी करून घेतले होते. मेसन हे आफ्रिकेच्या इतिहासाचे तज्ज्ञ आहेत तसेच छायाचित्रण कलेच्या इतिहासाचेही ते बिनीचे अभ्यासक आहेत.

त्यांनी या मासिकाच्या सव्वाशे वर्षांच्या अंकांतील छायाचित्रांचाच प्रथम अभ्यास केला तेव्हा ती छायाचित्रे आणि त्याखालील ओळी या वर्णभेदी दृष्टिकोनातूनच अवतरल्याची बोचरी जाणीव त्यांना झाली. या उभयतांमध्ये जी चर्चा झाली तिचा सारांशच सुसान यांनी संपादकीयात उद्धृत केला आहे.

‘कित्येक दशके आम्ही प्रकाशित केलेले लेख हे वर्णभेदीच होते. या भूतकाळावर मात करायची, तर प्रथम त्याची कबुली देणे हेच आमचे कर्तव्य आहे,’ हेच या संपादकीयाने शीर्षकातच नमूद केले आहे.

मी या मासिकाची पहिलीच महिला संपादक आहे, तसेच मी ज्यू आहे. त्यामुळे मी अत्यंत संवेदनशीलतेने जे घडले त्यातील चूक ओळखू शकते आणि कबूल करू शकते, असेही सुसान यांनी म्हटले आहे.

सुसान यांनी म्हटले की, १९७० पर्यंत अमेरिकेतील कृष्णवर्णीयांकडे या मासिकाने दुर्लक्षच केले. एक तर त्यांची संभावना मजूर किंवा घरकामगार एवढय़ापुरतीच केली. त्याच वेळी जगाच्या इतर भागांतील कृष्णवर्णीयांची छबी ही ‘नेटिव्ह’ म्हणून रंगवली आणि बरेचदा अर्धनग्न स्थितीतच राहणाऱ्या काही आदिवासी महिलांची चित्रे कामुक भासतील, अशा रीतीने प्रकाशित केली.

समाजमाध्यमांत पडसाद

विज्ञान, इतिहास, मानववंशशास्त्र आणि पर्यावरण या विषयाला प्रामुख्याने वाहिलेले हे मासिक सुबक छपाई आणि छायाचित्रांसाठीही अत्यंत प्रसिद्ध होते. अर्थात निव्वळ पाश्चात्त्य आणि गौरवर्णीय संकुचित दृष्टिकोनातून हे मासिक जगाचा वेध घेते, असा आरोप पूर्वीही या मासिकावर झाला आहे. या पाश्र्वभूमीवर या मासिकाने दिलेली ही प्रांजळ कबुली लक्षणीय ठरली आहे. या कबुलीचे काहींनी स्वागत केले आहे, तर या मासिकाचा निषेध करणाऱ्या तीव्र प्रतिक्रियाही समाजमाध्यमांतून उमटत आहेत. मेसन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, या मासिकाची छायाचित्रशैली अत्यंत प्रभावी होती, मात्र तितकीच ती वर्णद्वेष्टी आणि अन्यायकारक होती. तरीही अनेक होतकरू छायाचित्रकार या मासिकाचा आदर्श ठेवून तशीच छायाचित्रे मिळवण्यासाठी धडपडत होते, ही धोकादायक गोष्ट होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 2:19 am

Web Title: national geographic is finally reckoning with its racist coverage of people of color
Next Stories
1 जगभरातील आघाडीच्या ब्रँड्सच्या बाटलीबंद पाण्यात प्लास्टिकचे सूक्ष्म कण
2 भाजपविरुद्ध आघाडीसाठी शरद पवार-राहुल गांधी भेट
3 मोदी सरकारविरोधात विरोधक उद्या लोकसभेत अविश्वास ठराव मांडणार
Just Now!
X