नॅशनल हेराल्ड प्रकरणात पंतप्रधान कार्यालय आमच्यावर शंभर टक्के राजकीय सूड उगवित आहे, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. या प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह इतर काही आरोपींना आता १९ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. न्यायसंस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे असेही ते म्हणाले. काँग्रेस संसदेचा वापर न्यायव्यवस्थेला धमकावण्यासाठी करीत असल्याचा सत्ताधारी आघाडीचा आरोप त्यांनी फेटाळला, ते उलटय़ा अर्थाने खरे आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
संसदेबाहेर त्यांनी वार्ताहरांना सांगितले की, हा शंभर टक्के पंतप्रधान कार्यालयाने उगवलेला राजकीय सूड आहे, मला न्यायव्यवस्थेबाबत आदर आहे. शेवटी काय घडते ते आम्ही पाहात आहोत. खरे सत्य लवकरच बाहेर येईल. काँग्रेस संसदेचा वापर न्याय व्यवस्थेला धमकावण्यासाठी करीत आहे, या संसदीय कामकाज मंत्री एम.व्यंकय्या नायडू यांचा आरोप फेटाळताना त्यांनी सांगितले की, ते उलटय़ा अर्थाने खरे आहे. न्यायव्यवस्थेला कोण धमकावत आहे, हे आपल्या सर्वानाच माहिती आहे. काँग्रेसच्या सदस्यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी संसदेचे कामकाज बंद पाडले, त्यामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले.