राजकीय नेत्यांवर त्यांच्या समर्थकांची असलेली निष्ठा आणि या नेत्यांच्या एका इशाऱ्यासरशी काही करण्यास धजावणारे कार्यकर्ते ही गोष्ट काही आपल्याकडे नवीन नाही. काँग्रेससारख्या पक्षात तर गांधी घराण्यावरील निष्ठा सिद्ध करण्यासाठी नेते आणि कार्यकर्ते यांच्यात एकप्रकारची चढाओढ लागलेली असते. मात्र, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना दैवत मानणाऱ्या एका कार्यकर्त्याने या सगळ्यावर कडी केली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या रूपाने सोनिया आणि राहुल यांच्यावर आलेले गंडांतर दूर व्हावे, यासाठी कर्नाटकमधील सुरेश इंदूवाल यांनी तिरूपती बालाजीला नवस म्हटला होता. त्यानंतर याप्रकरणाच्या सुनावणीच्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी सोनिया आणि राहुल यांना जामीन मंजूर केला होता. त्यामुळे सुरेश इंदुवाल यांनी नवसपूर्तीसाठी चक्क आपल्या हाताची करंगळी तिरूपती बालाजीला दान केली. सुरेश यांनी कापलेली करंगळी १००० रूपयांच्या नोटेत गुंडाळून देवासमोरील हुंडीत टाकली. सोनिया आणि राहुल यांची सहीसलामत सुटका केल्याबद्दल बालाजीचे आभार मानणारे पत्रदेखील सुरेश यांनी हुंडीत टाकले. दरम्यान, या बातमीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.