‘नॅशनल हेराल्ड’ या सध्या बंद पडलेल्या वर्तमानपत्राच्या लखनऊ आणि दिल्लीतील मालमत्ता कथितरीत्या हडप केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी १९ डिसेंबरला दिल्लीतील न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जारी केलेले समन्स रद्द करण्यास नकार देत त्यांना मंगळवारी दिल्ली न्यायालयापुढे उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र, सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघेही आज न्यायालयात उपस्थित राहू शकत नाहीत, असे त्यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना १९ डिसेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले.
भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी या प्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप करत कनिष्ठ न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने सोनिया, राहुल यांच्यासह सुमन दुबे, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नाडिस, सॅम पित्रोदा आणि यंग इंडिया लिमिटेड यांच्याविरुद्ध न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. या नेत्यांनी समन्सला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देऊन ते रद्द करण्याची मागणी केली होती. हे समन्स रद्द करण्यात यावे, तसेच आपल्याला कनिष्ठ न्यायालयात वैयक्तिकरीत्या हजर राहण्यापासून सूट देण्यात यावी, अशी विनंती राहुल आणि सोनिया यांनी केली होती, परंतु न्या. सुनील गौर यांनी सोमवारी त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या होत्या.