सोनिया, राहुल यांना मंगळवारी न्यायालयात हजर राहण्यापासून सूट
१९ डिसेंबरला उपस्थितीचे न्यायालयाचे आदेश
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात दिल्ली न्यायालयाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मंगळवारी न्यायालयात हजर राहण्यातून सूट दिली. मात्र १९ डिसेंबरला होणाऱ्या पुढील सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचा आदेश दिला.
सोनिया यांनी ‘मी कुणाला घाबरत नाही’ असे वक्तव्य केले असून ‘हा राजकीय सूड आहे’ असे राहुल यांनी म्हटले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र यात राजकीय सूडाचा कुठलाही भाग नसून काँग्रेस नेत्यांनी न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे, असे स्पष्ट केले.
वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी, हरिन रावळ व रमेश गुप्ता यांनी गांधी कुटुंबीय व इतर आरोपींची बाजू मांडताना व्यक्तिगत उपस्थितीतून आमच्या अशिलांना आज तरी सूट द्यावी अशी विनंती केली. महानगर दंडाधिकारी लवलिन यांना सिंघवी यांनी सांगितले की, आमचे अशील न्यायालयात उपस्थित राहण्यास तयार आहेत पण ते आज उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे न्यायालयाच्या व तक्रारकर्ते सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या सोयीने दुसरी तारीख देण्यात यावी.
भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणात सात आरोपी आहेत. त्यांना आज उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता व ती तारीख सप्टेंबरमध्ये ठरवण्यात आली. आरोपी क्रमांक दोन राहुल गांधी हे आज सकाळी चेन्नईला निघून गेले आहेत.
दंडाधिकाऱ्यांनी बचाव पक्षाला सांगितले की, आरोपींना १९ डिसेंबर रोजी पुढच्या सुनावणीच्या तारखेस न्यायालयात हजर करण्याची हमी द्यावी. ते उपस्थित राहतील असे बघावे, त्या अटीवर व्यक्तिगत उपस्थितीतून आज सूट देण्यात येत आहे. १९ डिसेंबरला दुपारी तीन वाजता सोनिया गांधी, राहुल गांधी व इतर आरोपींनी हजर राहावे असे आजच्या सुनावणीत न्यायालयाने सांगितले.
वकील रमेश गुप्ता यांनी सांगितले की, आरोपी सॅम पित्रोदा हे अमेरिकेत आहेत. ते १९ डिसेंबर पूर्वीच न्यायालयात उपस्थित होतील. दिल्ली उच्च न्यायालयाने गांधी व इतर आरोपींनी सादर केलेल्या व्यक्तिगत उपस्थितीचे समन्स रद्द करण्याची याचिका उच्च न्यायालयाने काल फेटाळली होती. यात सुमन दुबे, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नाडिस, सॅम पित्रोदा व यंग इंडिया लिमिटेड हे प्रतिवादी आहेत.
दरम्यान, याप्रकरणी मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत काँग्रेस खासदारांनी सरकारवर टीका करत कामकाजात व्यत्यय आणला. त्यामुळे सभागृहांचे कामकाज अनेक वेळा स्थगित करावे लागले.

राजकीय सूड- राहुल गांधी</strong>
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले की, भाजपप्रणीत सरकार आमच्यावर राजकीय सूड घेत आहे, पण त्यामुळे दबून जाणार नाही. एनडीए सरकारला आपण प्रश्न विचारत राहू.
चेन्नईतील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी सांगितले की, नॅशनल हेराल्ड प्रकरण हा राजकीय सूड आहे, त्यातून केंद्र सरकारची काम करण्याची व विचाराची पद्धत समजते. असे केल्याने त्यांना प्रश्न विचारण्यापासून मी माघार घेईन असे त्यांना वाटत असेल तर त्यांनी भ्रमात राहू नये. माझे काम मी करणार, सरकारला प्रश्न विचारून दबाव आणत राहणार.

मी कुणाला घाबरत नाही- सोनिया
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘मी इंदिरा गांधी यांची सून आहे हे लक्षात ठेवा. मी कुणाला घाबरणार नाही. विचलितही होणार नाही.’ नॅशनल हेराल्ड प्रकरणात न्यायालयाने समन्स बजावल्याविषयी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या धोरण समितीच्या बैठकीनंतर ही प्रतिक्रिया व्यक्त केली.