22 September 2020

News Flash

अणू प्रकल्पविरोधी आंदोलनाला हिंसक वळण

तामिळनाडूतील कुडनकुलम येथील अणू प्रकल्पाविरोधातील आंदोलन चिघळत चालले असून शेजारील तुतीकोरीन जिल्ह्य़ात सोमवारी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात एका आंदोलक

| September 11, 2012 09:50 am

तामिळनाडूतील कुडनकुलम येथील अणू प्रकल्पाविरोधातील आंदोलन चिघळत चालले असून शेजारील तुतीकोरीन जिल्ह्य़ात सोमवारी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात एका आंदोलक मच्छीमाराचा मृत्यू झाल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुडनकुलम येथील अणुभट्टीत संपृक्त युरेनियम इंधन भरण्याची प्रक्रिया सुरू असून सदर काम तातडीने थांबवावे यासाठी स्थानिकांनी आंदोलन सुरूकेले आहे.
कुडनकुलम येथील अणू प्रकल्पविरोधी आंदोलन आता शेजारच्या जिल्ह्य़ांमध्येही पसरू लागले आहे. सोमवारी तुतीकोरिन जिल्ह्य़ातील मानापड या किनाऱ्यालगतच्या गावात स्थानिकांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. आंदोलनाला िहसक वळण लागल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात ४४ वर्षीय मच्छीमार आंदोलकाचा मृत्यू झाला. पीपल्स मूव्हमेंट अगेन्स्ट न्यूक्लियर एनर्जी या संघटनेने पोलीस गोळीबाराचा तीव्र निषेध केला आहे.
दरम्यान, कुडनकुलम येथे अणू प्रकल्पविरोधी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सुरुवातील अश्रुधुराचा वापर केला. अणुभट्टीत संपृक्त युरेनियम टाकण्याचे काम थांबवण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी वेढा घालण्याचा प्रयत्न या आंदोलकांनी केला.
प्रतिबंधात्मक आदेश मोडून हे निदर्शक कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पापासून ५०० मीटर अंतरावर एकत्र जमले होते. पोलीस व जिल्हा प्रशासनाने अनेक विनंत्या करूनही त्यांनी आंदोलन केले.
सोमवारी सकाळीही हा तिढा कायम राहिल्याने निदर्शकांना पांगवण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली. काही निदर्शकांनी सागरी मार्गाने येऊन सुरक्षा कडे तोडीत प्रकल्पाच्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडली व निदर्शकांचा पाठलागही केला.
काही जण समुद्राच्या दिशेने पळाले व पोलीस कारवाईच्या विरोधात घोषणा दिल्या. पीपल्स मूव्हमेंट अगेन्स्ट न्यूक्लियर एनर्जी या संघटनेचे निमंत्रक एस. पी. उदयकुमार यांच्या नेतृत्वाखालील सुमारे १००० आंदोलकांनी या अणू प्रकल्पात इंधन आणण्याची कृती थांबवण्यासाठी मुख्यमंत्री जयललिता यांनी हस्तक्षेप करावा, या मागणीसाठी निदर्शने केली.
या अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी दोन हजार पोलीस व जलद कृती दलाचे ४०० जवान तैनात करण्यात आले होते. प्रकल्पाच्या सात कि.मी. त्रिज्येच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. नियामक मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पात युरेनियम इंधन आणण्यासाठी परवानगी दिली आहे. भारत-रशिया यांचा हा संयुक्त अणुप्रकल्प डिसेंबरच्या अखेरीस सुरू होणे अपेक्षित होते. आंदोलनांमुळे हा प्रकल्प लांबत गेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2012 9:50 am

Web Title: national kudankulam atomic plant deshvidesh firing protest andolan rallhy
टॅग Firing,Protest
Next Stories
1 बिल मॉगरिज यांचे निधन
2 लाभार्थीत यूपीएचे मंत्री व खासदार आघाडीवर
3 मुंबई हल्ल्याच्या खटल्याच्या सुनावणीकडे वास्तव दृष्टीने पाहा
Just Now!
X