08 March 2021

News Flash

अंतरंग: पाकिस्तानची क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी

पाकिस्तानने अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या ‘शाहीन १ ए’ म्हणजेच हत्फ ४ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र ९०० किलोमीटपर्यंतचे लक्ष्य गाठू शकते.

| November 18, 2014 01:05 am

पाकिस्तानची क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी
इस्लामाबाद : पाकिस्तानने अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या ‘शाहीन १ ए’ म्हणजेच हत्फ ४ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र ९०० किलोमीटपर्यंतचे लक्ष्य गाठू शकते. भारतातील अनेक शहरे त्याच्या टप्प्यात येतात. या क्षेपणास्त्राच्या चाचणीपूर्वी त्यात काही रचनात्मक बदल करण्यात आले आहेत. या प्रक्षेपणाचा प्रभाव-बिंदू हा अरबी समुद्राच्या दक्षिणेला होता. नौदल अधिकारी महंमद झकाउल्ला व स्ट्रॅटेजिक कमांडचे झुबेर महंमद हयात, वैज्ञानिक व अभियंते यावेळी उपस्थित होते. गेल्या आठवडय़ात पाकिस्तानने ‘शाहीन दोन’ म्हणजे हत्फ ६ क्षेपणास्त्राची चाचणी केली होती, ते अण्वस्त्र वाहून नेऊ शकते शिवाय १५०० कि.मी पर्यंत लक्ष्य भेदू शकते.

बाबा रामदेव यांना झेड प्लस सुरक्षा
नवी दिल्ली : जिवाला असलेला धोका लक्षात घेता योगगुरू बाबा रामदेव यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्याचा निर्णय केंद्र  सरकारने घेतला आहे. रामदेव यांना धोका असल्याची माहिती सुरक्षा संस्थांनी दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला. आतापर्यंत त्यांना झेड दर्जाची सुरक्षा होती, मात्र आता त्यात वाढ करण्यात आली आहे. आता रामदेव यांच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या कमांडोंसह चाळीस जवान तैनात असतील. देशाबाहेरील काळा पैसा परत आणावा अशी मागणी रामदेव अनेक वर्षांपासून करीत आहेत.

प्राचीन नाणी सापडली
नमक्कल, तामिळनाडू : तिरूचेगोंडे येथे भिंत बांधण्यासाठी खोदकाम चालू असताना १९ व्या शतकातील चांदीची २१४० नाणी सापडली असून ती २५ किलो वजनाची आहेत. एका मडक्यात ती सापडली असे तिरूचेगोंडे येथील उप जिल्हाधिकारी सुमन यांनी सांगितले. सेल्वराज यांच्या जमिनीत सायंकाळी खोदकाम सुरू असताना मडके सापडले. त्यात राणी व्हिक्टोरियाचे चित्र असलेली १८३५ ते १८४० या काळातील नाणी सापडली. ती कोषागारात जमा करण्यात आली आहेत.

महसुलाबाबत केळकर समितीची शिफारस
नवी दिल्ली : खोल समुद्रातील तेल व नैसर्गिक वायूंच्या साठय़ांबाबत सध्याची उत्पादन वाटप व्यवस्था वापरावी, महसूल वाटप प्रारूप वापरू नये, अशी शिफारस विजय केळकर यांच्या नेतृत्वाखालील समितीने केली आहे. या समितीत दहा जणांचा समावेश होता. माजी अर्थ व पेट्रोलियम सचिव केळकर यांनी सांगितले की, उत्पादन वाटप करार पद्धती भारतीय स्थितीत महसूल वाटप प्रारूपापेक्षा योग्य आहे. महसूल वाटप प्रारूप हे रंगराजन पॅनेलने सुचवले होते, ते युपीए सरकारने स्वीकारले होते. सध्याच्या पद्धतीत कंपन्या तेलयुक्त व तेल नसलेल्या तेलविहिरींची विक्री करून सरकारकडून नफा उकळतात, त्यावर कॅगनेही टीका केली होती. त्यामुळे कंपन्या भांडवली खर्च वाढवतात व सरकारचा वाटा देण्यास विलंब लावतात.

जिंदाल अध्यक्षपदासाठी?
वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे लुसियानाचे गव्हर्नर बॉबी जिंदाल हे रिपब्लिकन पक्षाचे उगवते तारे मानले जातात. ते २०१६ मध्ये अध्यक्षीय निवडणूक लढवण्याचा विचार करीत आहेत. जिंदाल हे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षीय उमेदवार असण्याची शक्यता आहे. ते त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जिंदाल यांनी ओबामा यांच्या धोरणांवर टीका केली असून, आम्ही सत्तेवर असतो तर अमेरिकन ड्रीम धोक्यात आणले नसते असे त्यांनी म्हटले आहे.

नायजेरियात १३ ठार
किनो : नायजेरियाच्या ईशान्येला असलेल्या मोबाईल फोन बाजारपेठेत  एका महिला आत्मघाती बॉम्बरने केलेल्या हल्ल्यात १३ ठार व ८५ जण जखमी झाले आहेत. बाउची राज्यात अझारे येथे हा हल्ला झाला. या हल्ल्याची जबाबदारी कुणीही घेतली नाही, पण येथे बोको हरामचे इस्लामी अतिरेकी हल्ले करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2014 1:05 am

Web Title: national news from india 2
Next Stories
1 समस्या निर्माण करणाऱ्यांनी शिकवू नये
2 धर्मनिरपेक्ष आघाडी गरजेची; सोनिया गांधी यांचे मत
3 राजद-संयुक्त जनता दल विलीनीकरण?
Just Now!
X