केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर मंगळवारी येथील एका खासगी रुग्णालयात मधुमेह नियंत्रण शस्त्रक्रिया करण्यात आली़  शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत उत्तम सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितल़े ६१ वर्षीय जेटली यांना येथील साकेत रुग्णालयात सोमवारी रात्री दाखल करण्यात आले होत़े  गेल्या काही वर्षांपासून जेटली मधुमेहाने त्रस्त आहेत़  मंगळवारी यांच्यावर लॅप्रोस्कोपिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली़  ही शस्त्रक्रिया पूर्वनियोजित होती, अशी माहिती डॉ़  प्रदीप क़े चौबे यांनी दिली़  तसेच त्यांना एक-दोन दिवसांत घरी सोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितल़े

मंगळयान मोहिमेस ३०० दिवस पूर्ण
चेन्नई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या मार्स ऑरबायटर मिशन (मंगळयान) मोहिमेस ३०० दिवस पूर्ण झाले आहेत. आता यानास मंगळाच्या कक्षेत पोहोचण्यास केवळ तेवीस दिवसांचा अवधी उरला आहे. इस्रोने म्हटले आहे, की अंतराळयानाने सूर्यकेंद्री कक्षेत ६२.२० कोटी अंतर मंगळाच्या दिशेने कापले आहे. सध्या ते पृथ्वीपासून १९.९० कोटी किलोमीटर अंतरावर आहे. मार्स ऑरबायटर मिशन व त्याचा पेलोड चांगल्या अवस्थेत असून, आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने मंगळयान ५ नोव्हेंबर २०१३ रोजी सोडण्यात आले होते. २४ सप्टेंबरला ते ६८ कोटी किलोमीटर अंतर कापून मंगळाजवळ पोहोचेल, असे वैज्ञानिकांनी सांगितले.

काश्मीरमधील चकमकीत तीन दहशतवादी ठार
श्रीनगर  : काश्मीर खोऱ्यातील पुलावामा जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री लष्कर व दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. एका पडक्या घराच्या आड दहशतवादी लपले होते. त्या वेळी सैन्याने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांनीही प्रत्युत्तर दिल्यानंतर तब्बल तासभर ही चकमक सुरू होती. अखेर या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले. हे दहशतवादी कोणत्या संघटनेचे होते हे अद्याप कळू शकले नसून, त्याचा शोध घेण्यात येत आहे.

गाडी दरीत कोसळून तीन सैनिकांचा मृत्यू
श्रीनगर : काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात लष्कराची गाडी दरीत कोसळल्याने तीन सैनिक ठार झाले, तर चार जण जखमी झाले. कालारूस येथून लष्कराचा हा ट्रक कुपवाडा येथे जात होता. मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने साकुली भागात तो दरीत कोसळला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.