भारत-चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पूर्व लडाखमध्ये पेच सुरू असतानाच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्याशी दूरध्वनीवर रविवारी चर्चा केली. त्यात दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैन्य माघारी घेण्याचे मान्य करण्यात आले. डोभाल व वँग हे सीमाप्रश्नी दोन्ही देशांचे विशेष प्रतिनिधी आहेत त्यांच्यात ही चर्चा झाली.

भारताच्या परराष्ट्र कामकाज मंत्रालयाने दोन्ही प्रतिनिधींमधील चर्चा खुली व सखोल झाल्याचे स्पष्ट केले असून त्यात एकमेकांनी मतांचे आदान प्रदान केल्याचे म्हटले आहे. दोन्ही देशांनी सीमेवरील सैन्य माघारीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी यावर दोन्ही देशांचे मतैक्य झाले आहे.

भारत व चीन यांच्यात पूर्व लडाखमधील तणावामुळे गेले आठ आठवडे पेच सुरू असून पँगॉग त्सो, गलवान खोरे, गोग्रा हॉट स्प्रिंग या ठिकाणी चीनच्या सैन्याने घुसखोरी केली होती. चीनच्या लष्कराने सोमवारी सीमेवरून माघारी सुरू केली असून गलवान खोरे व गोग्रा हॉट स्प्रिंग भागातून सैन्य माघारी घेण्यास चीनने सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव कमी करण्यासाठी भारत व चीन या दोन्ही देशांनी सैन्य तातडीने माघारी घेण्याची गरज यावेळी प्रतिपादन करण्यात आली. परराष्ट्र खात्याने म्हटले आहे की, दोन्ही देशांनी वेगाने सैन्य माघारी घेण्याचे मान्य केले असून टप्प्याटप्प्याने सीमा भागातून सैन्य मागे घेत शांतता प्रस्थापित केली जाईल.

डोभाल व वँग यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे पालन करण्याचे आश्वासन एकमेकांना दिले असून जैसे थे परिस्थिती बदलण्यासाठी कुठलीही एकतर्फी कृती न करण्याचे मान्य करण्यात आले आहे. आगामी काळात कुठलाही हिंसक प्रसंग होऊ न देता शांतता पाळण्याचेही मान्य करण्यात आले. ३० जून रोजी भारत व चीन यांच्या लष्करादरम्यान लेफ्टनंट जनरल पातळीवर चर्चेची तिसरी फेरी झाली होती. त्यात टप्प्याटप्प्याने सैन्य माघारी घेण्याचे ठरले होते.

लेफ्टनंट जनरल पातळीवरील चर्चेची पहिली फेरी  ६ जूनला झाली होती, पण त्यात सैन्य माघारीवर मतैक्य होऊनही १५ जूनला चिनी सैन्याने गलवान भागात हिंसक चकमक केली त्यात भारताचे वीस जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर दोन्ही देशात तणाव आणखी वाढून मोर्चेबांधणी करण्यात आली होती.