राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे भूतान दौरा सोडून भारतात परतले आहेत. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर आता त्यांचे लक्ष पुलवामावर असणार आहे. जैश ए मोहमम्मद या दहशतवादी संघटनेने भारतावर हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर डोवल यांनी त्यांचा भूतान दौरा अर्धवट सोडला आहे ते भारतात परतले आहे. काकापोरा येथे वास्तव्यास असणाऱ्या आदिल अहमद या दहशतवाद्याने हा हल्ला घडवून आणला. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अजित डोवल परतल्याने भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल अशी चर्चा सुरु झाली आहे.

या दहशतवादी हल्ल्यानंतर घडणाऱ्या प्रत्येक हालचालींवर अजित डोवल यांची नजर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अजित डोवाल यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि आयबीचे संचालक या दोघांनीही इथे काय घडामोडी घडल्या याबाबत अजित डोवल यांच्याशी चर्चा केली. आता अजित डोवल काय करणार, या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काय रणनीती आखणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुलवामा या ठिकाणी CRPF च्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आत्तापर्यंत चाळीस जवान शहीद झाले आहेत. अनेक जवान जखमी झाले आहेत. पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक घडवून आणा आणि चोख प्रत्युत्तर द्या अशीही मागणी होऊ लागली आहे. अशात अजित डोवल आल्यानंतर आता त्यांचे सगळ्याच घडामोडींकडे लक्ष आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. लष्कराने या हल्ल्यानंतर शोध मोहीमही सुरु केली आहे.