राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय अजित डोवल यांचा मुलगा शौर्य पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शौर्य आता भाजपमध्ये सहभागी होणार आहे. उत्तराखंडमधील हल्दवानी येथे झालेल्या भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून ते सहभागी झाले होते. शौर्य यांना राजकारणात उतरवण्याची भाजपने योजना आखली आहे. राज्यसभेच्या माध्यमातून ते संसदेत येऊ शकतात. लोकसभा निवडणुकीत उमेदवारीही दिली जाऊ शकते, असेही बोलले जात आहे.

शौर्य हे पंतप्रधान मोदींच्या थिंक टँकमध्येही आहेत. इंडिया फाउंडेशनवरून काँग्रेसच्या निशाण्यावर ते आले होते. तेव्हापासून ते चर्चेत आहेत. उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकीवेळी ते भाजपचे नेते सतपाल महाराजांच्या समर्थनात चौबट्टाखाल विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी उतरले होते. आता कार्यकारिणी सदस्याच्या रूपात त्यांचा थेट पक्षात प्रवेश झाला आहे.

तत्पूर्वी, शौर्य हे रायबर उत्सवादरम्यान मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या घरी आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. शौर्य हे इंडिया फाउंडेशन नावाची थिंक टँक चालवतात. यामध्ये भाजपचे सरचिटणीस राम माधव, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि वाणिज्य मंत्री सुरेश प्रभूंसारख्या नेत्यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा आणि एम जे अकबर हेही शौर्य यांच्या संस्थेशी निगडीत आहेत.

भाजप कार्यसमितीच्या बैठकीत शौर्य यांच्या उपस्थितीवर पक्षाला स्पष्टीकरण द्यावे लागले होते. भाजप नेते अजय भट्ट म्हणाले की, शौर्य भाजपचे सदस्य आहेत आणि त्यांना बैठकीत सहभागी होण्यासाठी ‘विशेष आमंत्रित’ म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. ते मोदींच्या टीममधील एक आहेत.

शौर्य यांची बैठकीला उपस्थिती म्हणजे उत्तराखंडमधील त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात असल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.