जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी आणि तेथे शांतता कायम ठेवण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल बरेच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतंय. केंद्र सरकारने काश्मीरबाबत ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर अजित डोवाल दुसऱ्यांदा काश्मीरमधील जनतेशी संवाद साधण्यासाठी पोहोचले. शनिवारी(दि.10) अजित डोवाल यांनी दहशतवाद्यांचे केंद्र असणाऱ्या अनंतनाग येथील स्थानिक नागरिकांसोबत चर्चा केली. प्रसार भारतीने काश्मीरी जनतेशी संवाद साधतानाचे त्यांचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यात अजित डोवाल अनंतनागमध्ये सामान्य नागरिकांशी संवाद साधताना दिसतायेत.

प्रसार भारतीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अजित डोवाल अनंतनागच्या बाजारात पशू व्यापाऱ्यांशी चर्चा करताना दिसतायेत. बकरी ईदसाठी मेंढी विकण्यासाठी आलेल्या मेंढपाळांशी सुद्धा अजित डोवाल यांनी संवाद साधला. त्यांच्याबरोबर चर्चा करताना, बोकडांचा दर, वजन आणि खुराक यांची ते विचारणा करत आहेत. त्यांच्या प्रश्नावर एक व्यापारी डोवाल यांना बोकड कारगिल जिल्ह्यातील द्रासमधून आणल्याचे सांगतो. त्यावर तुम्हाला द्रास कुठेय हे माहितीये का? असा प्रश्न तो व्यापारी अजित डोवाल यांना विचारतो. त्यानंतर डोवाल यांच्यासोबत असणारे अनंतनागचे उपायुक्त खालिद जनागिर हे त्या व्यापाऱ्यांना ‘तुम्ही ज्यांच्याशी बोलत आहे, ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.’ असं सांगताना दिसत आहेत.

अन्य एका व्हिडिओमध्ये अनंतनागच्या बाजारात फिरताना नागरिकांची भेट घेताना डोवाल दिसत आहेत. कसे आहेत लोक इकडे? काही त्रास तर नाही ना? असं डोवाल येथील स्थानिकांना विचारतात. त्यावर स्थानिक आपल्या समस्या डोवाल यांच्यासमोर मांडताना दिसत आहेत. त्यांच्या समस्या ऐकून झाल्यानंतर, लवकरच स्थितीमध्ये सुधारणा होईल असं उत्तर डोवाल यांनी दिलं. डोवाल यांच्या या काश्मीरभेटीचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.

विशेष दर्जा देणारे कमल 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शांतता कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालजम्मू-काश्मीरमधील जनता, पोलीस आणि लष्काराच्या जवानांसोबत चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेताना दिसत आहेत. शनिवारी अजित डोवाल यांनी अनंतनाग येथील स्थानिक नागरिकांसोबत चर्चा केली. तसेच, याठिकाणी बकरी ईदसाठी मेंढी विकण्यासाठी आलेल्या मेंढपाळांशी सुद्धा अजित डोवाल यांनी संवाद साधला. विशेष, म्हणजे दोन दिवसांपूर्वी अजित डोवाल हे जम्मू-काश्मीरमधील शोपियान येथे गेले होते. यावेळीही त्यांनी लोकांशी चर्चा करुन त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वादही घेतला होता.