देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. मात्र करोनाचा फैलाव पुन्हा वेगाने पसरू नये यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण हे सर्वात मोठं हत्यार आहे. मात्र गेल्या काही दिवसात लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे सरकारकडून लसीकरणाबाबत दररोज माहिती दिली जात आहे. जून महिन्यात १२ कोटी लशींचे डोस उपलब्ध केले जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम १ मे पासून सुरु झाली आहे. शुक्रवारपर्यंत देशात २०.८६ कोटी करोना लशींचे डोस दिले गेले आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अजूनही १.८२ कोटी लशींचे डोस उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती. तसेच पुढच्या तीन दिवसात ४ लाखांहून अधिक डोस मिळतील असं सांगण्यात आलं आहे.

केंद्राने जाहीर केलेल्या धोरणानुसार प्रत्येक महिन्यात ५० टक्के लशी केंद्र सरकारकडून खरेदी केल्या जातात. या लशी राज्यांना विनामुल्य पुरवल्या जातात. उर्वरित ५० टक्के लशी राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या धोरणानुसार केंद्र सरकारने राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना आगाऊ माहिती दिली आहे. झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांव्यतिरिक्त तामिळनाडू, जम्मू काश्मीर आणि मध्य प्रदेशात लस वाया घालवण्याचं प्रमाण अधिक आहे. तामिळनाडूत १५.५ टक्के, जम्मू काश्मीरमध्ये १०.८ टक्के आणि मध्य प्रदेशमध्ये १०.७ टक्के इतक्या लशी वाया गेल्या आहेत. एकूण देशाचा विचार केला तर आतापर्यंत देशात ६.३ टक्के लशी वाया गेल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी दिली होती.

पंतप्रधान मोदींची ‘ऑक्सिजन वॉरियर्स’सोबत ‘मन की बात’; म्हणाले…

लसीकरणाच्या १३४ व्या दिवशी म्हणजेत शनिवारी २८ लाख ९ हजार ४३६ जणांचं लसीकरण केलं गेलं आहे. देशात कोव्हॅक्सिन, कोविशील्ड आणि स्पुटनिक व्ही या लशी उपलब्ध आहेत.