उधमपूरजवळ पकडलेला दहशतवादी उस्मान मोहम्मद नावेद पाकिस्तानचा नागरिक नसल्याचा कांगावा पाकिस्तानने सुरू केला आहे. तो पाकिस्तानी असल्याचा आरोप भारताने करू नये, अशी मागणीही पाकिस्तानने गुरुवारी केली.
उधमपूरजवळ बुधवारी सकाळी दोन दहशतवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. यावेळी एका दहशतवाद्याला स्थानिक लोकांनी पकडून पोलीसांच्या हवाली केली. त्याने स्वतःचे नाव उस्मान मोहम्मद नावेद असल्याचे सांगितले आणि तो पाकिस्तानातील फैसलाबादचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर लगेचच पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सईद काझी खलिलुल्हा यांनी पत्रकार परिषद घेऊन तो दहशतवादी पाकिस्तानी नागरिक नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, कोणत्याही घटनेनंतर लगेचच पाकिस्तानवर आरोप करणे अयोग्य आहे. या स्वरुपाच्या माहितीमध्ये तथ्य असले पाहिजे. त्यामुळे जेव्हाही पाकिस्तानवर आरोप केले जातील, त्यावेळी त्यासोबत पुरावेही दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. माध्यमांमधील माहितीवर आपण प्रतिक्रिया देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.