केंद्राने ओरिसाला विशेष राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी ओरिसाचे मुख्यमंत्री व बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी बुधवारी दिल्लीमध्ये महामोर्चाचे आयोजन केले आहे.
खनिज संसाधनांनी परिपूर्ण असणा-या ओरिसाबरोबर केंद्राकडून दुजाभाव केला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. खाण उद्योगामधून मिळणा-या रॉयल्टीमध्ये राज्याला अत्यल्प वाटा मिळत असून, त्यामध्ये वाढ करण्यात यावी ही मोर्चाची प्रमुख मागणी आहे.
“प्रत्येक वर्षी राज्य़ातर्फे राष्ट्रीय कोषामध्ये प्रचंड भर टाकण्यात येते. मात्र, केंद्राकडून आम्हाला खूप कमी निधीचा परतावा मिळतो. खनिजांमधून मिळणा-रॉयल्टीमध्ये तातडीने वाढ करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे. राजकारण करून ओरिसाला नेहमी दुर्लक्षित केले जाते. दुस-या बाजूला बिहार, बंगाल व उत्तर प्रदेश सारख्या राज्यांना राजकीय फायदा होत आहे”, असं पटनायक इंडियन एक्स्प्रेसशी दिल्लीमध्ये बोलताना म्हणाले.
पटनायकांसह बिजू जनता दलाच्या ३० नेत्यांचे शिष्टमंडळ राष्ट्रपती प्रणव मुखर्जीं यांची बुधवारी दिल्लीमध्ये भेट घेणार आहेत. त्यावेळी राष्ट्रपतींना ओरिसाच्या एक कोटी जनतेच्या सह्या असलेले मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहेत. “हे निवेदन ओरिसाच्या जवळजवळ प्रत्येक घरात सह्यांसाठी गेले होते”, असे पटनायक म्हणाले.