पंजाबमध्ये पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी गुरुवारी नव्या राजकीय पक्षाची औपचारिक घोषणा केली. चंदीगढमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिद्धू यांनी ‘आवाज ए पंजाब’ पक्षाची घोषणा केली. पंजाबला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देण्याच्या ध्येयाने आपण हा राजकीय पक्ष काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंजाबची संपूर्ण राज्यव्यवस्थाच ढासळली असून, ती पूर्ववत करण्याचे आव्हान आपल्यापुढे असेल, असेही त्यांनी सांगितले.
सिद्धू म्हणाले, एकेकाळी देशाला अन्नपुरवठा करणारा आणि अन्नदाता म्हणून ओळखला जाणारे पंजाब राज्य आता अडचणीत सापडले आहे. पंजाबमधील तरूण अमली पदार्थांच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे पंजाबला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणे आणि समृद्ध राज्य करण्याचे ध्येय आपल्यापुढे असणार आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. केजरीवाल यांनी आपल्याबाबत अर्धसत्यच सांगितले. पण त्याचा उर्वरित भाग मी सगळ्यांसमोर आणेन, असे त्यांनी स्पष्ट केले. आम आदमी पक्षाने आपल्याला निवडणूक लढवू नका, असे सांगितले होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
काही महिन्यांपूर्वी सिद्धू यांनी राज्यसभेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर ते आम आदमी पक्षामध्ये जाणार अशी चर्चा सुरुवातीला होता. आम आदमी पक्षाचे पंजाबमधील नेतृत्त्व सिद्धूंकडे सोपविण्यात येईल, अशी चर्चा होती. पण काही दिवसांपूर्वीच सिद्धू नवीन पक्ष काढणार असल्याची माहिती पुढे आली होती. या पक्षाचे नावही त्यावेळीच ‘आवाज ए पंजाब’ असल्याचे स्पष्ट झाले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर गुरुवारी नव्या पक्षाची औपचारिक घोषणा करण्यात आली. या पक्षामुळे पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे.