गेल्या काही दिवसात पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. २०२२ विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेटही घेतली. मात्र त्यानंतर ते प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया न देताच निघून गेल्याचं कळत आहे.

सुनील जाखड यांना हटवून काँग्रेसच्या पंजाब प्रदेशाध्यक्षपदी नवज्योत सिंह सिद्धू यांची वर्णी लावण्यात राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा अडथळा असल्याचं मानलं जात आहे. पंजाबच्या मंत्रिमंडळाला धक्का लागणार, सिद्धू यांची नियुक्ती महत्त्वाच्या पदी होणार अशा चर्चा रंगू लागल्याने वातावरण अधिकच चिघळलं होतं. त्यानंतर अमरिंदर सिंह आणि सिद्धू या दोघांनीही आपापल्या बाजूच्या आमदारांसह आणि मंत्र्यांसह वेगळ्या बैठका घेतल्या.

हेही वाचा – तोडगा निघाला! अमरिंदरच मुख्यमंत्री, सिध्दू प्रदेशाध्यक्ष, पंजाब काँग्रेसचा तिढा सुटला

अमरिंदर सिंह यांच्या विरोधात खुलेपणाने बंड करणाऱ्या सुखजिंदर सिंह रंधावा, चरणजीत सिंह आणि त्रिप्त राजिंदर बाजवा या तीन कॅबिनेट मंत्र्यांसह आमदारांचीही बैठक सिद्धू यांनी घेतली. तर दुसऱ्या बाजूला अमरिंदर सिंह यांनी आपल्या बाजूच्या आमदार आणि खासदारांची बैठक त्यांच्या मोहाली येथील विश्रामगृहावर घेतली. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, बंड करणाऱ्या मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिमंडळात होणाऱ्या बदलांमुळे भीती वाटू लागली होती. त्यामुळे त्यांनी इतर आमदारांसह राजीनामा देण्याची धमकी दिली.

हे प्रकरण चिघळत जाईल यासाठी तडजोड करण्याचं नियोजन सुरु झालं. या नियोजनाप्रमाणे सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं जाईल. त्यांच्यासोबत दोन इतर दोन वर्किंग प्रेसिडेंट्सही असतील ज्यापैकी एक दलित समाजातील असेत तर दुसरा हिंदू असेल, अशी माहिती समोर आली. मात्र, अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. यानंतर सिद्धू आणि अमरिंदर सिंह या दोघांनीही सोनिया गांधी तसंच राहुल गांधींची भेट घेतली. गेल्या आठवड्यात अमरिंदर यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर सांगितलं की, जो निर्णय हायकमांड घेईल त्याच्याशी आपण सहमत असू.

अमरिंदर सिंह आणि नवज्योत सिंह सिद्धू यांच्यातला हा वाद २०१७ पासूनचा आहे, जेव्हा काँग्रेसने पंजाब निवडणुका जिंकल्या होत्या. सिद्धू हे २०१७ च्या निवडणुकांच्या आधी भाजपा सोडून काँग्रेस पक्षात सामील झाले होते. तेव्हापासून त्यांना सत्तेची अपेक्षा आहे. मात्र, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह त्यांच्या वाटेतला अडथळा ठरत आहेत.