राज्यसभेचा तडकाफडकी राजीनामा दिलेल्या माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू याने सोमवारी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेत राजीनाम्यामागील कारण स्पष्ट केले. पंजाबपासून लांब राहायचे. पंजाबकडे बघायचे नाही, असे मला सांगण्यात आल्यामुळेच मी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्यासाठी राष्ट्रधर्म सर्वांत मोठा आहे. मग मी माझ्या राज्याला कसे सोडायचे, असा प्रश्न विचारत सिद्धू यांनी पंजाबचे हित जिथे आहे. त्याच पक्षामध्ये जाणार असल्याचे स्पष्ट केले. कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबद्दल काहीही माहिती दिलेली नाही.
राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर सिद्धू आम आदमी पक्षात प्रवेश करणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. पण सिद्धू यांनी थेटपणे कोणत्याही पक्षाचे नाव घेतलेले नाही. त्यामुळे ते पुढे काय करणार, याबद्दलची उत्सुकता कायम आहे. पत्रकार परिषदेत सिद्धू म्हणाले, माझ्यासाठी पंजाबपेक्षा कोणताही पक्ष मोठा नाही. माझ्या निर्णयाने माझे नुकसान झाले तरी चालेल. पण मी पंजाबला कधीच सोडणार नाही. माझ्यासाठी हा विषय फायद्या तोट्याचा अजिबातच नाही. पहिल्यांदा मी अमृतसरमधून निवडून आलो ते मी सेलिब्रिटी होतो म्हणून पण त्यानंतर माझे काम, माझे वर्तन आणि माझ्या निष्कलंक चारित्र्यामुळेच लोकांनी मला निवडून दिले. याआधीही मला पंजाबमध्ये जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मला अमृतसरऐवजी दुसऱ्या ठिकाणाहून निवडणूक लढविण्यास सांगण्यात आले होते. पण मी शांत बसलो. मात्र, आता शांत बसू शकत नाही. पंजाबकडे बघायचे नाही, असे मला कोणी सांगत असेल, तर मी शांत बसू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत विरोधक बुडले. पण त्याच लाटेत मलाही बुडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे मी आता शांत राहणार नाही. जिथे पंजाबचे हित असेल, तिथे मी जाणार, असे सांगत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला.