चंडीगड : पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून नवज्योत सिंग सिद्धू यांनी कार्यभार स्वीकारला आहे. त्या वेळी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग उपस्थित होते. नवज्योत सिंग सिद्धू व अमरिंदर हे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात पण तूर्त तरी त्यांनी तलवारी म्यान केल्या आहेत.

नवीन कार्यकारी अध्यक्षांमध्ये संगत सिंह गिलझियान, सुखविंदर सिंग डॅनी, पवन गोयल, कुलजित सिंग नाग्रा यांचा समावेश आहे. त्यांनीही याच कार्यक्रमात पदाची सूत्रे स्वीकारली.  वरिष्ठ काँग्रेस नेते व अ.भा. काँग्रेस समितीचे प्रभारी हरीश रावत, माजी मुख्यमंत्री राजिंगर कौर भट्टल, वरिष्ठ नेते प्रताप सिंह बाजवा, लाल सिंग या वेळी उपस्थित होते.

सिद्धू यांनी सांगितले की, पंजाबच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना आज नवीन प्रमुख मिळाला आहे. नेता व कार्यकर्ता यांच्यात काही फरक नसतो. कार्यकर्तेच पक्षाचा आत्मा असतात. क्रिकेटपटूचा राजकारणी झालेल्या सिद्धूने सध्याचे प्रदेशाध्य्क्ष सुनील जाखड यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.