भाजपचे माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांची आम आदमी पक्षात (आप) प्रवेश करण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी आपला नावावर शिक्कामोर्तब व्हावा या सिद्धू यांच्या मागणीला दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी नकार दिला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नाराज सिद्धू एका नव्या पक्षाची घोषणा करून त्यामध्ये ते इतर पक्षासह आपमधील असंतुष्ट नेत्यांना सहभागी करून घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गत जुलै महिन्यात सिद्धू यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चंदीगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर टीका केली होती. मला पंजाबमधील राजकारणात लक्ष न घालण्याची सूचना केल्यामुळे आपण पक्ष सोडत असल्याचे त्यांनी या वेळी म्हटले होते. माझ्यासाठी राष्ट्रधर्म सर्वांत मोठा आहे. मग मी माझ्या राज्याला कसे सोडायचे, असा प्रश्न विचारत सिद्धू माझ्यासाठी पंजाबपेक्षा कोणताही पक्ष मोठा नाही. माझ्या निर्णयाने माझे नुकसान झाले तरी चालेल. पण मी पंजाबला कधीच सोडणार नाही. माझ्यासाठी हा विषय फायद्या तोट्याचा अजिबातच नाही, असे म्हटले होते.
दुसरीकडे पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी अरविंद केजरीवाल स्वत: इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. केजरीवाल हे मुळचे हरियाणाचे आहेत. तसेच ते शीख समाजाचेही नाहीत. या बाबी त्यांच्यासाठी अडचणीच्या ठरू शकतात. दिल्लीमध्ये त्यांनी आपली बहुतांश जबाबदारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडे सोपवली आहे.