पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू  यांनी मंगळवारी संध्याकाळी नवी दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही राजकीय नेत्यांमध्ये तब्बल पाऊणतास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील अद्यापपर्यंत उपलब्ध झालेला नाही. मात्र, पंजाबच्या आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि आवाज ए पंजाबने एकत्रित लढविण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच यासंदर्भातील औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीसाठी हळूहळू वातावरण तापू लागले आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी वेगवेगळी पक्षीय समीकरणे जुळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू या निवडणुकीत काय चमत्कार दाखवणार, ते कोणाच्या पाठिशी आपले पाठबळ उभे करणार, यावरही राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना सध्या उधाण आले आहे. सिद्धू यांनी आवाज ए पंजाब पक्षाची स्थापन केली असली, तरी त्यांना आपल्यासोबत घेण्यासाठी एकीकडे काँग्रेस तर दुसरीकडे आम आदमी पक्षही प्रयत्नशील आहे.

सविस्तर वृत्त थोड्याचवेळात….