News Flash

सिद्धू दाम्पत्याचा भाजपला रामराम, प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

चंदीगढमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिद्धू यांनी ‘आवाज ए पंजाब’ पक्षाची घोषणा केली होती

navjot singh sidhu,
पत्रकार परिषदेत माहिती देताना नवज्योत सिंग सिद्धू.

पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या पक्षाची घोषणा केल्यानंतर माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. या दोघांनीही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा बुधवारी दिला. पंजाबमध्ये पुढील होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यातच सिद्धू यांनी नव्या पक्षाची औपचारिक घोषणा केली होती.
चंदीगढमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिद्धू यांनी ‘आवाज ए पंजाब’ पक्षाची घोषणा केली. पंजाबला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देण्याच्या ध्येयाने आपण हा राजकीय पक्ष काढल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंजाबची संपूर्ण राज्यव्यवस्थाच ढासळली असून, ती पूर्ववत करण्याचे आव्हान आपल्यापुढे असेल, असेही त्यांनी त्यावेळी सांगितले होते.
नवज्योत कौर सिद्धू म्हणाल्या, मी केवळ माझ्या भागातील प्रश्न उपस्थित केले होते. ते करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. पण मला तसेही करू देण्यात आले नाही. ही काही लोकशाही नाही. हुकूमशाही वर्तणुकीचाच हा प्रकार आहे. जर मी सामाजिक प्रश्न मांडत असेल, तर त्या पक्षविरोधी कारवाया कशा ठरतात, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, एकेकाळी देशाला अन्नपुरवठा करणारा आणि अन्नदाता म्हणून ओळखला जाणारे पंजाब राज्य आता अडचणीत सापडले आहे. पंजाबमधील तरूण अमली पदार्थांच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे पंजाबला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणे आणि समृद्ध राज्य करण्याचे ध्येय आपल्यापुढे असणार आहे, असे सिद्धू यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यांनी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली होती. केजरीवाल यांनी आपल्याबाबत अर्धसत्यच सांगितले. पण त्याचा उर्वरित भाग मी सगळ्यांसमोर आणेन, असे त्यांनी स्पष्ट केले. आम आदमी पक्षाने आपल्याला निवडणूक लढवू नका, असे सांगितले होते, असेही त्यांनी सांगितले.
काही महिन्यांपूर्वी सिद्धू यांनी राज्यसभेतील सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर ते आम आदमी पक्षामध्ये जाणार, अशी चर्चा सुरुवातीला होती. आम आदमी पक्षाचे पंजाबमधील नेतृत्त्व सिद्धूंकडे सोपविण्यात येईल, अशी चर्चा होती. पण त्यानंतर सिद्धू नवीन पक्ष काढणार असल्याची माहिती पुढे आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2016 12:06 pm

Web Title: navjot singh sidhu resigns from bjp membership
Next Stories
1 अमित शहा यांनी दिलेल्या ‘ओणम’च्या शुभेच्छा वादात, माफी मागा, केरळवासियांची मागणी
2 उत्तर प्रदेशात सत्तेवरून ‘यादवी’; सत्ताधारी यादव कुटुंबात कलह
3 टाटांसाठी ममता बॅनर्जी यांचा नवा प्रस्ताव
Just Now!
X