क्रिकेट समालोचकाची भूमिका उत्कृष्टपणे निभावणारे भाजपचे माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू आता पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी प्रचार करणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी ही माहिती दिली. सिद्धू आणि त्यांची पत्नी नवज्योत कौर यांच्या पक्षातील प्रवेशाबाबतची चर्चा पूर्ण झाली आहे. आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे, असेही त्यांनी सांगितले.

सिद्धू आणि त्यांची पत्नी आमच्यासोबत आहे. ते कोणत्याही जागेवर निवडणूक लढणार नाहीत. मात्र, काँग्रेस पक्षाच्या प्रचार मोहिमेत सहभागी होतील, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदरसिंग यांनी केली. दरम्यान, सिद्धू यांनी भाजपला रामराम करत आवाज-ए-पंजाब या नव्या पक्षाची स्थापना केली. त्यांची पत्नी नवज्योत कौर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. त्यात सिद्धू यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबतच्या तर्कवितर्कांना उधाण आले होते.

सिद्धू यांनी सप्टेंबरमध्ये आपल्या नवीन पक्षाची घोषणा मोठ्या धूमधडाक्यात केली होती. तसेच समान विचार असलेल्या पक्षांच्या नेत्यांना पक्षात सहभागी होण्याचे निमंत्रण त्यांनी दिले होते. त्याचवेळी रविवारी आवाज-ए-पंजाबमधील दोन नेत्यांनी आम आदमी पक्षाशी आघाडी केल्याची घोषणा केली. त्यानंतर सिद्धू हे काँग्रेससोबत जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. नवज्योतसिंग सिद्धू, परगत सिंग आणि बैन्स बंधू यांनी एकत्र येऊन आवाज- ए-पंजाब नावाचा पक्ष स्थापन केला होता. त्यातील दोन महत्त्वाचे नेते बैन्स बंधू यांनी आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. भाजपला रामराम केल्यानंतर सिद्धू हे आम आदमी पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा होती. आपचा पंजाबमधील मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून सर्वानीच त्यांना गृहीत धरले होते. असे असतानाच त्यांनी ‘आप’ला चकवा देत ‘आवाज- ए-पंजाब’ या नव्या पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. राज्यसभेची खासदारकी तडकाफडकी सोडून भाजपला जसा आश्चर्याचा धक्का दिला होता, तसाच प्रयोग सिद्धू यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही केला होता.