काँग्रेसच्या महाअधिवेशनातील आपल्या भाषणामुळे चर्चेत आलेले पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू अडचणीत आले आहेत. प्राप्तिकर विभागाची वक्रदृष्टी सिद्धू यांच्याकडे वळल्याचे दिसते. प्राप्तिकर विभागाने सिद्धू यांची दोन बँक खाती गोठवली आहेत. सिद्धू यांनी आपल्या विवरण पत्रात कपड्यांवर २८ लाख, प्रवासावर ३८ लाखांपेक्षा जास्त, इंधन खर्च सुमारे १८ लाख आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावर ४७ लाखांहून अधिक खर्च दाखवल्याचे समजते. वर्ष २०१४-१५ च्या विवरण पत्रात सिद्धू यांनी हे खर्च दाखवले नव्हते. त्यांनी अजून याचे बिलही सादर केलेले नाही. परंतु, सिद्धू यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे आधीच दिली असल्याचे सांगितले आहे. एकतर या सर्वांचे बिल सादर करा किंवा कर भरून टाका, असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे.

याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने सिद्धूंना तीन नोटिसा पाठवल्या असल्याचे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले आहे. नोटिसा पाठवल्यानंतर १४ फेब्रुवारीला सिद्धूंची दोन बँक खाती गोठवण्यात आली. दरम्यान, अकाली दलाने सिद्धूंवर टीव्ही शोमध्ये सहभागी होण्यावरून निशाणा साधला आहे. मंत्री महोदयांकडे जनतेसाठी वेळ नाही. पण टीव्ही शोसाठी आहे. जनतेने कुठे जावे आणि कोणाला भेटावे ? असा सवाल उपस्थित केला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेसच्या महाअधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या भाषणात सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. राहुल भाई, तुम्ही कार्यकर्त्यांना एकत्रित करा, पुढच्या वर्षी लाल किल्ल्यावर तुम्हीच ध्वजारोहण कराल, असे त्यांनी म्हटले होते.

[jwplayer 0DBUoSBV-1o30kmL6]