अमरिंदर सिंग यांच्या मंत्रीमंडळामध्ये कॅबिनेट मंत्र्याचे स्थान मिळाल्यानंतर तुम्ही टी. व्ही. मालिकांमध्ये झळकणार का असा प्रश्न माजी कसोटीपटू नवज्योत सिंग सिद्धूला विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर सिद्धूने सकारात्मक दिले आहे.  आपण टी. व्ही. शोमध्ये यापुढेही काम करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. मी माझे मंत्रीपद आणि टी. व्ही. मालिकांवरील काम दोन्ही एकत्रितरित्या सांभाळू शकेल असे सिद्धू यांनी म्हटले. माझ्या या कार्यक्रमामुळे माझ्या मंत्रीपदाच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. दोन्ही जबाबदारी मी अगदी योग्यरित्या सांभाळू शकतो असे सिद्धू यांनी म्हटले.

माझे राज्यातील कामकाज आटोपल्यावर मी शुटिंगसाठी जाईल. रात्रीच्या वेळी माझे शूटिंग संपवेल आणि पहाटे तीन वाजता घरी येईल. तेव्हा माझ्या शुटिंगच्या कामामुळे माझ्या मंत्रीपदाच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. जर लोकांना माझ्या या शेड्यूलची तक्रार नाही तर तुम्हाला का असावी असा प्रश्न सिद्धू यांनी विचारला.  कपिल शर्मा शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू परीक्षकाचे काम करतात. तसेच समलोचन किंवा इतर टी. व्ही. शोमध्येही त्यांची नेहमीच उपस्थिती असते. भारतीय जनता पक्षामध्ये असताना देखील ते आपल्या मतदार संघात कमी आणि टी. व्ही. वर अधिक दिसतात अशी ओरड केली जात होती. त्यानंतर ते राज्यसभेवर गेले. त्यावेळी देखील त्यांची राजकीय कार्यक्रमात कमी आणि टी. व्ही. कार्यक्रमामध्ये जास्त उपस्थिती असायची. त्यामुळे त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला.

सिद्धू यांना उप-मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. परंतु अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसने पंजाबमध्ये विजय मिळवला आणि त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. त्यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था, सांस्कृतिक कार्य आणि पर्यटन मंत्रालयाचा कारभार असणार आहे. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी नवज्योत सिंग सिद्धू यांना आम आदमी पार्टीचेही दार ठोठावून पाहिले अशी चर्चा होती. सिद्धू यांना मुख्यमंत्रीपद हवे होते. त्यांना ते देण्यास आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे तयार नव्हते. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये गेले. या ठिकाणी आपल्याला निदान उप-मुख्यमंत्रीपद तरी मिळेल असे त्यांना वाटत होते परंतु अमरिंदर सिंग आणि राहुल गांधी यांनी उप-मुख्यमंत्री पदच नको अशी भूमिका घेतली.