आयएनएस सिंधुरत्न या भारतीय पाणबुडीला झालेल्या अपघाताची नैतिक जबाबदारी स्विकारत भारतीय नौदलाचे प्रमुख डी.के.जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही महिन्यांतील अपघाताच्या घटना ताज्या असतानाच बुधवारी आयएनएस सिंधुरत्नला झालेल्या अपघातात सात नौसैनिक जखमी झाले असून या पाणबुडीवरील लेफ्टनंट आणि लेफ्टनंट कमांडर असे दोन अधिकारी बेपत्ता झाले आहेत. संरक्षण मंत्रालयाकडून नौदलप्रमुख डी.के.जोशी यांचा राजीनामा स्विकारण्यात आला आहे. नौदलाचे उपप्रमुख आर.के.धोवन यांच्याकडे आता भारतीय नौदलाची सुत्रे सोपवण्यात येणार आहेत. हा अपघात झाला तेव्हा या पाणबुडीवर ८० नौसैनिक असल्याचे समजते. अपघातानंतर बेपत्ता असणारे दोन नौसेनिक मृत झाल्याची शक्यतासुद्धा आता वर्तविण्यात येत आहे.