अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढत असताना भारतीय नौदलाने आखातामध्ये ओमानच्या समुद्रात दोन युद्धनौका तैनात केल्या आहेत. ओमानच्या समुद्र मार्गावरुन वाहतूक करणाऱ्या भारतीय जहाजांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय नौदलाने या युद्धनौका तैनात केल्या आहेत. मागच्या काही दिवसात या भागात दुसऱ्या देशांच्या दोन तेलाच्या टँकरवर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून भारतीय नौदलाने युद्ध जहाजे तैनात करण्याचा निर्णय घेतला. पर्शियन गल्फ आणि आखातात ओमानच्या समुद्रातून वाहतूक करणाऱ्या भारतीय जहाजांच्या सुरक्षिततेसाठी ‘ऑपरेशन संकल्प’ अंतर्गत आयएनएस चेन्नई ही डिस्ट्रॉयर आणि आयएनएस सुनैना ही दोन जहाजे तैनात करण्यात आल्याची माहिती नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी.के.शर्मा यांनी गुरुवारी दिली.

भारतीय नौदल पी-८ आय या दीर्घ पल्ल्याच्या गस्ती विमानाद्वारे या मार्गाची हवाई टेहळणी करत आहे. आखातातील जहाजांच्या हालचालींवर भारतीय नौदलाचे बारीक लक्ष आहे असे कॅप्टन शर्मा यांनी सांगितले. ओमानच्या समुद्रात तेलाच्या दोन टँकरवर झालेल्या हल्ल्यासाठी अमेरिका आणि अन्य देशांनी इराणला जबाबदार ठरवले आहे. इराणने आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत.