संरक्षण क्षेत्रात अधिकाधिक आधुनिक आणि स्वयंपूर्ण होण्याकडे भारताची वाटचाल सुरू असतानाच नौदलाच्या मागे मात्र साडेसाती लागली आहे. गेल्या सहा महिन्यांत भारतीय युद्धनौका क्षतिग्रस्त वा धोका निर्माण होण्याची पाचवी घटना उघडकीस आली असून, मुंबईत बंदरात आयएनएस बितवा या युद्धनौकेला तडा गेल्याचे समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धोका लक्षात आल्यानंतर युद्धनौका तातडीने पाण्याबाहेर काढून तिची तपासणी सुरू करण्यात आली आहे. मुंबई बंदरातील पाण्याची पातळी कमी असल्यामुळे गेल्या काही घटनांमध्ये युद्धनौकांना धोका निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
सहा महिन्यांपूर्वी मुंबईच्या समुद्रालगत आयएनएस सिंधुरक्षक या पाणबुडीत क्षेपणास्त्रांचा स्फोट होऊन १८ नौसैनिक शहीद झाले होते. त्यानंतर गेल्या आठवडय़ात सिंधुघोष ही आणखी एक युद्धनौका क्षतिग्रस्त होता होता बचावल्याचे समोर आले आहे. त्यातच आता आयएनएस बितवा ही युद्धानौका पाण्यात गेली असता पाणी झिरपत असल्याचे लक्षात आले. तपासणी केली असता या युद्धनौकेवरील सोनार यंत्रणेला बारीकसा तडा गेल्याचे आढळून आल्याचे नौदल सूत्रांनी सांगितले.
सोनार यंत्रणा ही युद्धनौकांच्या खालच्या भागात लावलेली असते. त्यामुळे मुंबई बंदरात ती दाखल झाल्यावर तळातील एखादी वस्तू सोनार यंत्रणेवर आदळली असेल आणि तिला तडा गेला असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. समुद्रातील चाचांविरोधातील मोहीम पूर्ण करून ही युद्धनौका मुंबई बंदरात दाखल झाल्यानंतर तिला तडा गेल्याचे आढळून आले.
युद्धनौकेला धोका असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तातडीने ती पाण्याबाहेर आणण्यात आली. कोरडय़ा डॉकमध्ये तिची तपासणी करण्यात येत असून तडा जाण्यामागील कारण शोधण्यात येत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

सहावी घटना गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये आयएनएस सिंधुरक्षकमध्ये दुर्घटना होऊन १८ नौसैनिक मरण पावले होते. याशिवाय विशाखापट्टणम येथील डॉकमध्ये असलेल्या नवीन युद्धनौकेलाही आग लागली होती. तर रत्नागिरी येथे आयएनएस तलवार या युद्धनौकेला मासेमारी करणाऱ्या बोटीची धडक बसली होती. नौदलाच्या युद्धनौकांना वारंवार अशाप्रकारे अपघातांना सामोरे जावे लागल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे.