चिनी नौदलाच्या सात युद्धनौका हिंदी महासागर क्षेत्राच्या आसपास कार्यरत आहेत. अमेरिकन बनावटीच्या पी-आठ आय पाणबुडीविरोधी विमान आणि अन्य टेहळणी उपकरणांच्या सहाय्याने चिनी नौदलाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. दक्षिणेकडच्या भागातून श्रीलंकेच्या समुद्र सीमेमध्ये प्रवेश करण्याआधी चीनच्या शियान-३२ युद्धनौकेचा फोटो काढण्यात आला.

नौदलाच्या पी-आठ आय विमानाने हा फोटो काढला. सागर तळाशी असलेली पाणबुडी शोधून काढण्याबरोबर टेहळणीसाठी सुद्धा पी-आठ आय उपयुक्त विमान आहे. चिनी नौदलाच्या युद्धनौकांच्या हालचालींवर पी-आठ आयद्वारे बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. सोमालियन समुद्री चाच्यांपासून चीनच्या व्यापारी जहाजांचे रक्षण करण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या फ्रिगेटसही हिंदी महासागर क्षेत्रात असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

भारताच्या इकोनॉमिक झोनजवळ असताना या युद्धनौकांचा सातत्याने माग काढण्यात आला. समुद्री चाच्यांविरोधातील कारवाईचे ड्रील करण्यासाठी कुठल्याही क्षण चीनकडून सहा ते सात युद्धनौका तैनात करण्यात येऊ शकतात. हिंदी महासागर क्षेत्रात आपली ताकत दाखवून देणे हा चिनी नौदलाचा खरा उद्देश आहे. चीनची या भागातून मोठया प्रमाणात व्यापारी वाहतूक होते.

त्यामुळे हिंदी महासागर क्षेत्रात चीनला आपला प्रभाव वाढवायचा आहे. चीन तिसऱ्या युद्धनौकेची बांधणी करत असून लवकरच ही युद्धनौका सुद्धा कार्यरत होईल अशी सूत्रांची माहिती आहे. भारताकडे सध्या आयएनएस विक्रमादित्य ही एकमेव विमानवाहू युद्धनौका आहे आणि दुसऱ्या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेची कोचीन शिपयार्डमध्ये बांधणी सुरु आहे. नौदलाला ६० हजार टनापेक्षा जास्त वजनाची तिसरी विमानाहून युद्धनौका बांधायची आहे.

नौदलाल पूर्णवेळ दोन विमानवाहू युद्धनौका हव्या आहेत. ज्या कधीही, कुठल्याही क्षणी वापरता येऊ शकतात. तीन युद्धनौका असल्या तरच हे शक्य आहे. तीन पैकी एक युद्धनौका दुरुस्तीसाठी असेल तर अन्य दोन कार्यरत राहू शकतात हा त्यामागचा विचार आहे. पायरसी विरोधी मोहिमेचा भाग म्हणून २००८ पासून चिनी नौदल सातत्याने हिंदी महासगार क्षेत्रात तैनात असते.