रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. वादग्रस्त जागा हिंदुंना देण्यात येईल. तर मुस्लिमांना मशिदीसाठी वेगळी जमीन देण्यात येईल. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट केलं आहे. देशात धर्माच्या नावावरून आणखी कोणता नवीन वाद निर्माण होणार नाही अशी आशा आहे, असं त्यांनी ट्विट करत म्हटलंय. अयोध्या प्रकरणाचा आज सुप्रीम कोर्टाने निकाल जाहीर केला आहे त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी आपलं मत आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

ट्विटरवर नवाब मलिकांनी लिहिलं, ‘सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निकाल असेल तो आम्हाला मान्य असेल आणि सर्वांनी मान्य करावा अशी आमची सुरुवातीपासूनच भूमिका राहिली आहे. देशात धर्माच्या नावावरून आणखी कोणता नवीन वाद निर्माण होणार नाही अशी आशा आहे.’ आमची सुरुवातीपासून भूमिका होती की, जो सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे. त्यामध्ये राजकीय पक्ष असतील, धार्मिक संघटना असतील, यांनी मान्य केला पाहिजे असेही नवाब मलिक म्हणाले.

याअगोदर लोकांनी मान्य केले आहे. त्यामुळे लोकांनी याचं श्रेय घेवू नये, कुठेही उत्सव साजरा करु नये. कुणाच्या भावना दुखावल्या जावू नये ही भावना लोकांनी स्वीकारली पाहिजे असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.

अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाची असल्याचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशांचं लक्ष लागलं होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी याआधीच सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. रामजन्मभूमी मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा तसेच मुस्लीम वक्फ बोर्डाला मशिदीच्या उभारणासाठी पाच एकरांची पर्यायी जागा देण्याचा निकाल न्यायालयानं दिला आहे. या खटल्याची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे झाली. बाकी सगळे वादी प्रतिवादी अग्राह्य ठरवत केवळ रामलल्ला व सुन्नी वक्फ बोर्ड या दोघांचाच खटला लढवण्याचा हक्क सुप्रीम कोर्टानं मान्य केला. यामुळे सर्व वादग्रस्त जागेवर रामलल्लाचा हक्क असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.