काश्मीर प्रश्नावर भारताची कोंडी करण्यासाठी पाकिस्तानने आता नवा डाव रचला आहे. काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराचा प्रश्न जागतिक पातळीवर मांडण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी २२ खासदारांचे शिष्टमंडळ नेमले आहे. आता पाकिस्तानच्या या खेळीवर भारत काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्राचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात काश्मीरमधील हिंसाचारावरुन भारताची कोंडी करण्याचे मनसुबे पाकिस्तानने आखले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी २२ खासदारांचे शिष्टमंडळ नेमले आहे. संयुक्त राष्ट्रासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध ठिकाणी हे खासदार काश्मीर प्रश्न मांडणार आहेत. पाकिस्तानी खासदारांच्या शिष्टमंडळाला पाकिस्तानी जनतेचा आणि सरकारचा पाठिंबा असल्याचे नवाझ शरीफ यांनी म्हटल्याचे वृत्त पाकिस्तानमधील वृत्तपत्रांनी दिले आहे. काश्मीरमध्ये सुरु असलेला कायद्याचा दुरुपयोग पाकिस्तान जगासमोर आणेल असा इशाराही शरीफ यांनी दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे सल्लागार सरताज अझीझ यांनीदेखील आंतरराष्ट्रीय पातळीवर मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अझीझ यांनी अमेरिका, युरोपीय महासंघाच्या वरिष्ठ अधिका-यांची भेट घेत काश्मीर प्रश्न उपस्थित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच भाग असल्याचे म्हटले होते. एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान भारताची कोंडी करण्याचे प्रयत्न करत असतानाच पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासीत यांनी भारतासोबत पाकिस्तान चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले. भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा चर्चा सुरु होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. ते दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलत होते. पाकिस्तानसोबत दहशतवाासंदर्भात चर्चा करु अशी भूमिका भारताने घेतली आहे. आता पाकिस्तानच्या या शिष्टमंडळामुळे पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 27, 2016 6:46 pm